नवी दिल्ली / अलीगड : अलीगडच्या हरदुआगंज भागात समाजवादी पक्षाचे नेते राकेश यादव यांची मंगळवारी (३० एप्रिल) रात्री उशिरा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, गोळी लागल्यानंतर यादव यांचा जागीच मृत्यू झाला. हत्येच्या सूचनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ही हत्या कुणी आणि का केली? याचा पोलीस तपास करत आहेत.
एका बाईकवरून आलेल्या दोघांनी राकेश यादव यांच्यावर गोळ्या झाडल्याचं समजतंय. गोळी झाडल्याचा आवाज ऐकताच परिसरातील लोक घटनास्थळी जमा झाले. कुटुंबीयांनाही रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राकेश यादव यांना पाहताच धक्का बसला.
हत्येची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची एक टीम घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी राकेश यादव यांचा मृतदेह ताब्यात घेतला. कुटुंबीयांनी या हत्येचं कारण जमिनीचा वाद असल्याचं म्हटलंय. एका जमिनीवर प्लॉटिंग करण्यावरून राकेश यादव यांचा एकाशी वाद सुरू होता. यासंबंधात तक्रारीही दाखल करण्यात आल्या होत्या. परंतु, हत्येमागचं खरं कारण शोधून काढण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर आहे.