नवी दिल्ली : नथुराम गोडसे देशभक्त होता असे विधान करुन वादात अडकलेल्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांना पक्षाच्या कारवाईला सामोरे जावे लागले. हे प्रकरण सुरु असताना भाजपच्या आणखी एका नेत्याने वादग्रस्त विधान केले आहे. भाजप आमदार सुरेंद्र सिंह हे वादग्रस्त विधान करुन चर्चेत आले आहेत. नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांची हत्या करुन चूक केली पण तो दहशतवादी नव्हता. सुरेंद्र सिंह हे बलिया जिल्ह्याच्या बैरिया विधानसभा क्षेत्रातील आमदार आहेत. राष्ट्र विरोधी कारवायांमध्ये सहभागी असणारा दहशतवादी असतो. गोडसे दहशतवादी नव्हता. गोडसेकडून चूक झाली. त्याने राष्ट्रभक्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करायला नको होती असे ते म्हणाले.
गोडसे राष्ट्रभक्त होता का ? असा प्रश्न यावेळी या भाजप आमदारांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी याचे उत्तर टाळले. खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना नथुराम गोडसेबद्दल केलेलं वादग्रस्त वक्तव्य भोवलंय. प्रज्ञासिंह ठाकूर यांची संरक्षण समितीवरून हकालपट्टी करण्यात आलीय. भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांनी प्रज्ञासिंह यांचं वक्तव्य निषेधार्ह असून भाजप त्याचं समर्थन करत नसल्याचं म्हटलंय. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हटलं होतं. त्यावरून वाद निर्माण झाला आहे.
साध्वींच्या या वक्तव्यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप नोंदवलाय. संघ आणि भाजपच्या जे मनात आहे, ते साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या आहेत. हे काही लपून राहिलेलं नाही. प्रज्ञासिंह ठाकूर यांची हकालपट्टी व्हावी, असं सांगून मी माझा वेळ फुकट घालवणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले. तर या प्रकरणावर जे बोलायचं होतं ते आम्ही बोललो आहोत, असं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या आहेत.
लोकसभेमध्ये एसपीजी संशोधन बीलावर डीएमके खासदार ए राजा यांनी आपले मत मांडले. गांधीहत्येबद्दल गोडसेनी केलेल्या वक्तव्याचा उल्लेख यावेळी त्यांनी केला. ए राजा बोलत असताना साध्वी प्रज्ञा सिंह यांनी त्यांना अडवले. तुम्ही एका देशभक्ताचे उदाहरण देऊ शकत नाही असे साध्वी यांनी म्हटले. त्यांच्या या विधानाने लोकसभेत गोंधळ निर्माण झाला. प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे हे विधान लोकसभा कार्यवाहीतून हटवण्यात आले.