नवी दिल्ली : गुरजारत विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने भाजपसमोर तगडे आव्हान उभा केले आहे. प्रचारादरम्यान दोन्ही पक्ष एकमेकांवर तुटून पडले आहेत. दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान, एका प्रचारसभेला संबोधीत करताना पंतप्रधान मोदींनी गुजरात निवडणूकीत पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप केला. यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले. मोदींच्या या आरोपावर पाकिस्तानने पलटवरा केला आहे. आपल्या निवडणुकीच्या राजकारणात भारत-पाकिस्तानला आणू नका.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता डॉ. मोहम्मद फैजल यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवर म्हटले आह की, 'भारताने आपल्या निवडणुकीच्या राजकारणात पाकिस्तानला ओढू नये. त्यांनी आपल्या हिमतीवर विजय मिळवायला हवा. उगाच षडयंत्र रचून केलेले आरोप बेजबाबदार आहेत.'
गुजरातमधील पालनपूर येथील सभेत रविवारी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच निलंबीत झालेले कॉंग्रेस नेते मणी शंकर अय्यर यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या बैठकीचा उल्लेख केला. हा उल्लेख करताना मोदींनी म्हटले होते की, कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी मणीशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी पाकिस्तानी नेत्यांसोबत बैठक घेतली होती. त्यानंतर लगेचच पुढच्या दिवशी अय्यर यांनी मोदींबाबत बोलताना नीच या शब्दाचा उल्लेख केला. पुढे बोलताना मोदींनी म्हटले होते की, तुम्हाला कदाचीत या गोष्टीवर विश्वास नाही बसणार पण, हे फार गंभीर प्रकरण आहे. या बैठकीनंतरच गुजरातच्या जनतेचा आपमान करण्यात आला.
India should stop dragging Pakistan into its electoral debate and win victories on own strength rather than fabricated conspiracies, which are utterly baseless and irresponsible.
— Dr Mohammad Faisal (@ForeignOfficePk) December 11, 2017
प्रसारमाध्यमांत आलेल्या वृत्तानुसार अय्यर यांच्या घरी झालेल्या बैठकीत पाकिस्तानचे उच्चायुक्त, पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री, भारताचे माजी उपराष्ट्रपती आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह उपस्थित होते. दरम्यान, मोदींनी ही बैठक तब्बल तीन तास चालल्याचेही म्हटले होते. तसेच, या बैठकीत काय योजना ठरली यामी माहिती देशाला देण्यात यावी असेही मोदींनी आपल्या भाषणात म्हटले होते.
दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी 2 टप्प्यांत मतदान होत आहे. त्यापैकी मतदानाचा पहिला टप्पा 9 डिसेंबरला पार पडला आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये 14 डिसेंबरला मतदान होत आहे. मतमोजनी 18 डिसेंबरला मतमोजनी होणार आहे.