नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यावर्षी १ फेब्रुवारी २०२० रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी त्याच्या छपाईचं काम सुरु होतं. पण छपाईच्या कामाची सुरुवात अतिशय खास पद्धतीने सुरु होते. अनेक वर्षांपासून अर्थसंकल्पाची छपाई सुरु करण्याआधी 'हलवा सेरेमनी' करण्याची प्रथा आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही छपाई होण्यापूर्वी एका मोठ्या कढाईमध्ये गोड हलवा बनवण्यात आला. यावेळी अर्थमंत्री निर्मला सितारमण आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर उपस्थित होते. त्यानंतर हलवा वित्तमंत्र्यांसह कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्ये वाटून 'हलवा सेरेमनी' पार पडली.
अर्थसंकल्प गोपनीय असल्याने त्याच्या छपाईच्या काळात अर्थमंत्रालयात कडेकोड सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येते.
Delhi: Finance Minister Nirmala Sitharaman at 'Halwa Ceremony' being held at Ministry of Finance, North Block, to mark the beginning of printing of documents relating to Union Budget 2020-21. pic.twitter.com/WnCt9Hm4Ws
— ANI (@ANI) January 20, 2020
अर्थसंकल्पाची हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषेत छपाई केली जाते. अर्थमंत्रालयातील नॉर्थ ब्लॉकमध्ये हलवा सेरेमनी पार पडल्यानंतर अर्थसंकल्पासंबंधी मंत्रालयातील सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांना अर्थसंकल्प सादर होईपर्यंत पुढील १५ दिवस नजरकैदेत ठेवण्यात येणार आहे. त्यांना बाहेरील कोणत्याही व्यक्तीशी बोलण्याची मुभा नसते. त्यांच्या कुटुंबियांशीही ते बोलू शकत नाहीत. त्यांना मोबाईल वापरण्यासाठीही बंदी घालण्यात आलेली असते. नजरकैदेत असताना कर्मचाऱ्यांना मंत्रालयातच राहावं लागतं.