'बेसन बर्फी' बनवत नव्वदीपार आजीबाईंनी सुरु केला स्टार्टअप

It`s never too late.... 

Updated: Jan 20, 2020, 12:36 PM IST
'बेसन बर्फी' बनवत नव्वदीपार आजीबाईंनी सुरु केला स्टार्टअप title=
छाया सौजन्य- ट्विटर

मुंबई : अनेकदा आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्याच दिशेने धावण्याकडेच आपला कल असतो. बरं त्यासाठी किती वेळ दवडला जाणार आहे याची कित्येकांना कल्पनाही नसते. पण, तरीही मनात एक ध्यास असतो. सध्या अशाच एका ध्यासापोटी आणि इच्छेपोटी चंदीगढमधील एका आजीबाईंनी तरुणाईलाही अभिमान वाटेल अशी एक गोष्ट केली आहे. 

हरभजन कौर Harbhajan असं या आजींचं नाव. त्यांचं वय जवळपास ९४ वर्षे. उतारवयात सहसा अनेकजण आपल्या तब्येतीची काळजी घेताना दिसतात. पण, हरभजन कौर यांनी एके दिवशी त्यांची मुलगी रवीना हिच्याशी संवाद साधताना तिच्याकडे आपली एक इच्छा बोलून दाखवली. आजवर मी खूप सुखी आयुष्य जगले. पण, तुला कोणतीही खंत आहे का या मुलीने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत अखेर त्यांनी मनातील एक इच्छा बोलून दाखवली. 

आजवर मी कधीच स्वत:च्या बळावर पैसे कमवले नाहीत, तसं झालं असतं तर..... असं म्हणत हरभजन यांचं मुलीसोबतचं संभाषण तिथेच थांबलं. पण, रवीना सुरी या त्यांच्या मुलीच्या मनात मात्र काही नव्या विचारांची सुरुवात झाली होती. ज्या पदार्थाच्या चवीने रवीना यांच्या कुटुंबातील अनेकांच्या मनावर राज्य केलं त्याच पदार्थाची चव इतरांपर्यंत पोहोचवण्याचा विचार त्यांना सुचला आणि चार वर्षांपूर्वी Harbhajan'sची सुरुवात झाली. बेसन बर्फी आणि विविध प्रकारची लोणची चंदीगढ येथील स्टार्टअपच्या माध्यमातून सर्वांच्या भेटीला आली. पाहता पाहता त्यांची चव अनेकांपर्यंत पोहोचली आणि लोकप्रियता झपाट्याने वाढली. 

आपल्या घरामध्ये बनणाऱ्या चवीष्ट पदार्थांमागे जिच्या हात होता ती आई, हरभजन या मात्र कायम पडद्यामागच्या कलाकारांप्रमाणे मागेच राहिल्या. अर्थात त्यांच्या हातून तयार होणाऱ्या प्रत्येक पदार्थाची चव मात्र सर्वांच्या जिभेवर रेंगाळत राहिली होती. हरभजन मात्र न थकता इतरांसाठी, बहुविध पदार्थ करत होत्या. 

हरभजन यांनी पहिल्यांदाच कशा प्रकारे पैसे कमवले होते, याविषयी सांगताना रवीना यांनी एक प्रसंग सांगितला. पहिल्यांदाच इथल्या स्थानिक मार्केटमध्ये (तिने) हरभजन यांनी एक दुकान सुरु केलं. ग्राहकांशी संवाद साधला, घरी परत येताना तिने २ हजार रुपये आणले होते. ती तिची पहिली हक्काची कमाई होती. 

दोन हजार रुपयांची ती कमाई हरभजन यांना बराच आत्मविश्वास देऊन गेली. तेव्हापासून त्या बेसन बर्फी, विविध प्रकारच्या चटण्या आणि लोणची तयार करुन दर दहा दिवसांनी स्थानिक बाजारपेठेत विकू लागल्या. वाढतं वय कधी यामध्ये त्यांचा अडथळा बनलं नाही. एकिकडे रवीना म्हणजेच हरभजन यांची मुलगी त्यांच्या या अनोख्या स्टार्टअपमध्ये आधार झाली. तर, दुसरीकडे ब्रँड आणि पँकेजिंग अशा कामांमध्ये त्यांना नातीची साथ मिळाली. Harbhajan's या प्रॉडक्टची टॅगलाईनही तितकीच लक्षवेधी आणि आपलीशी वाटणारी आहे. 'बचपन की याद आजाएगी', ही टॅगलाईनच सारंकाही सांगून जाणारी आहे. 

हरभजन यांच्या हातची बेसनची बर्फीच आपल्या लग्नसोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकांसोबत पाहुण्यांना पाठवण्यात यावी असा रवीना यांच्या नातीचा आग्रह होता. याच आग्रहाखातर हरभजन यांनी नातीच्या लग्नासाठी जवळपास २०० किलोंची बर्फी बनवली होती. 

दर दिवशी त्या ५-१० किलो बर्फी तयार करतात. ८५० रुपये प्रति किलो अशा दराने ही खास बर्फी विकली जाते. सध्याच्या घडीला हरभजन या त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीने मोठ्या आत्मविश्वासाने या व्यवसायात उतरल्या आहेत. या साऱ्यामध्ये त्यांच्या चेहऱ्यावर असणारे आनंदाचे भाव अनेकांचं मन सुखावणारेच आहेत. 

हरभजन यांची पाककला आणि त्यांच्या हातची बर्फी इतकी लोकप्रिय झाली आहे की ऑर्डर देण्यासाठी त्यांचा फोन सतत खणाणत असतो. हरभजन यांच्या या जिद्दीची आणि प्रबळ इच्छाशक्तीची कहाणी पाहून खुद्द आनंद महिंद्रा यांनीही त्यांची प्रशंसा केली आहे. 'entrepreneur of the year' अशा शब्दांत त्यांनी या हरहुन्नरी आणि गोड अशा आजीबाईंचा बहुमान केला आहे.