LIVE कार्यक्रमात अभिनेत्रीचे कपडे फाडले, तक्रार दाखल

'तीन जणांनी मला घेरलं आणि माझे कपडे फाडण्याचाही प्रयत्न केला... या घटनेचा फक्त विचार करूनही माझा थरकाप उडतोय'

Updated: Apr 25, 2018, 10:03 PM IST
LIVE कार्यक्रमात अभिनेत्रीचे कपडे फाडले, तक्रार दाखल  title=

मुंबई : ओडिसाची प्रसिद्ध अभिनेत्री उसासी मिश्रा हिच्यासोबत एका लाईव्ह कार्यक्रमात प्रेक्षकांनी छेडछाड केल्याची घटना घडलीय. या संदर्भात उसासी हिनं पोलिसांतही तक्रार दाखल केलीय. अंगुल जिल्ह्यातील डेरांग गावात आयोजित कार्यक्रमासाठी गेली असताना उसासी हिच्यासोबत हा प्रकार घडला. घटनास्थळी असणाऱ्या तीन जणांनी तिला घेरलं आणि तिचे कपडे फाडण्याचाही प्रयत्न केला. यासंदर्भात दाखल केलेल्या तक्रारीत उसासीनं इंद्रमणि साहू आणि त्याच्या दोन मुलांवर शारीरिक छळाचा आरोप केलाय. उसासी हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय... यामध्ये आपल्यासोबत घडलेली घटना उसासी रडत कथन करताना दिसत आहे. 

'इस्टर्न ब्लू ऑपेरा'द्वारे आयोजित एका कार्यक्रमात उसासीचा डान्स परफॉर्मन्स आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात ही घटना घडली. शारीरिक छळासोबत उसासीनं आपल्या गाडीच्या नुकसानीचीही तक्रार दाखल केलीय. 

'तीन जणांनी मला घेरलं आणि माझे कपडे फाडण्याचाही प्रयत्न केला... या घटनेचा फक्त विचार करूनही माझा थरकाप उडतोय. ही घटना रात्री 11.45 च्या सुमारास घडली. आरोपींविरुद्ध कडक कारवाई व्हायला हवी. मला तायक्वांडो येत असल्यानं मी सुरक्षित राहू शकले' असं उसासीनं आपल्या व्हिडिओत म्हटलंय. 

यानंतर अभिनेत्रीनं सोशल मीडियावर एका पोस्टमधून आपण स्वत:ची कशी सोडवणूक केली? याची पोस्टही लिहिली. परंतु, नंतर मात्र ही पोस्ट डिलीट करण्यात आली. 

पोलिसांनी या घटनेला दुजोरा देत, या प्रकरणाचा एफआयआर दाखल केला गेला असून चौकशी सुरू असल्याचं सांगितलंय.