मुझफ्फरनगर: भारत-पाक सीमारेषेवर काहीतरी मोठं होऊन गेलंय, असे सूचक वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. ते शुक्रवारी मुझफ्फरनगर येथील जाहीर सभेत बोलत होते. राजनाथ सिंह यांच्या या विधानावरून भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हद्दीत आणखी एक मोठा सर्जिकल स्ट्राईक केल्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी पाकिस्तान लष्कराकडून भारतीय जवानाच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली होती. तसेच पाककडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भाष्य करताना राजनाथ सिंह यांनी म्हटले की, काहीतरी झालेय, मी सांगणार नाही. सगळं ठीक झालं आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, दोन-तीन दिवसांपूर्वी सर्वकाही ठीक झाले आहे. भविष्यातही काय होईल, ते पाहत राहा, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले.
याशिवाय, संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनीही शनिवारी पाकला खडे बोल सुनावले. सर्जिकल स्ट्राइक हे पाकिस्तानला देण्यात आले चोख प्रत्युत्तर होते. पाकने त्यातून धडा घेतला असेल किंवा नसेल पण सीमेवरील आमची कारवाई यापुढेही कायम राहणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.