नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीआधी भाजपा विरोधी पक्ष आज दिल्लीच्या जंतर-मंतर येथे एकत्र येणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या महारॅलीचे आयोजन केले असून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना देखील याचे आमंत्रण देण्यात आले आहे. या महारॅलीमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू, माजी पंतप्रधान एचडी देवगौडा आणि नॅशनल कॉन्फ्रंस (नेकॉ) नेता फारूक अब्दुल्ला सहभागी होणार आहेत.
समाजवादी पार्टी, द्रमुक, राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रीय लोक दल आणि इतर पक्षांचे नेता या सभेला संबोधित करतील असे आपचे दिल्ली संयोजक गोपाल राय यांनी माध्यमांना सांगितले. जे मागच्या महिन्यात तृणमूल कॉंग्रेस अध्यक्ष बॅनर्जी यांच्यातर्फे बोलावण्यात आलेल्या भाजपा विरोधी रॅलीमध्ये सहभागी झाले होते अशा सर्व नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणूकीला काही महिनेच राहीले आहेत. अशावेळी भाजपाला विरोधी महायुती करणाऱ्या पक्ष या रॅलीत एकत्र येतील.
ममता बॅनर्जी आजच्या आपने आयोजित केलेल्या 'हुकूमशाही हटवा आणि देश वाचवा' या कार्यक्रमात जनतेला संबोधित करणार आहेत. यासंदर्भात दिल्लीमध्ये ठिकठिकाणी बॅनर्स लागले आहेत. दिल्लीमध्ये तुम्ही मनमोकळेपणाने हसा कारण इथे लोकशाही जिवंत आहे असा मजकूर या होर्डींग्जवर लिहिण्यात आला आहे.
जंतर-मंतर इथल्या रॅलीनंतर त्या संसद भवनातील तृणमुल कॉंग्रेसच्या कार्यालयात जाणार आहेत. तिथे त्या इतर पक्षांच्या खासदारांशी चर्चा करणार आहे. या शहरातील एका सरकारी कार्यक्रमात देखील त्या सहभागी होणार आहेत.