ज्याला पती समजत होती तो भलताच निघाला, महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली, म्हणाली '10 वर्षांपूर्वी...'

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बलिया (Balia) येथे शुक्रवारी एक महिला एका व्यक्तीला 10 वर्षांपूर्वी आपलेला हरवलेला पती समजून घरी घेऊन आली होती. पण घरी आल्यानंतर तिने शरीरावरील ओळखचिन्ह शोधण्याचा प्रयत्न केला असता तिला काहीच सापडलं नाही. यानंतर तिला आपण भलत्याच व्यक्तीला घरी आणलं असल्याचं लक्षात आलं.   

शिवराज यादव | Updated: Jul 30, 2023, 11:46 AM IST
ज्याला पती समजत होती तो भलताच निघाला, महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली, म्हणाली '10 वर्षांपूर्वी...' title=

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बलिया (Balia) येथील एक व्हिडीओ नुकताच चर्चेत आला होता. यामध्ये एक महिला एका व्यक्तीला पाहून त्याला आपला 10 वर्षांपूर्वी हरवलेला पती समजून भावूक झाली होती. पण आता त्या प्रकरणात एक नाट्यमय वळण आलं आहे. मानसिक स्थिती योग्य नसणारी ही व्यक्ती आपला पती नसून, चुकीच्या व्यक्तीला आपण घरी घेऊन आल्याचं महिलेने म्हटलं आहे. 

शुक्रवारी महिलेला बलिया जिल्हा रुग्णालयात एक मानसिक रुग्ण दिसला होता. यावेळी तिला तो आपला हरवलेला पती मोतीचंद असल्याचं वाटलं होतं. यामुळे ती त्याला घऱी घेऊन आली होती. पण जेव्हा घरी आल्यानंतर तिने त्याच्या शरिरावरील ओळखचिन्ह पाहण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिला काहीच सापडलं नाही. यानंतर महिलेला हा आपला पती मोतीचंद नसल्याचं लक्षात आलं. 

रुग्णालयाबाहेर दिसला भिकारी; त्याला पाहाताच महिलेच्या डोळ्यात अश्रू, 10 वर्षांपूर्वी हरवलेला तो...

 

या व्यक्तीची ओळख पटली असून, राहुल असं त्याचं नाव असल्याचं समोर आलं आहे. यानंतर राहुलच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला. यानंतर त्यांना बोलावून राहुलला त्यांच्याकडे सोपवण्यात आलं. 

दरम्यान, महिलेने चेहरा मिळता जुळता असल्याने आपला गैरसमज झाल्याचं म्हटलं आहे. चेहरा समान असल्याने मी त्याला घेऊन घरी आली होती. पण त्याच्या शरिरावर ओळखचिन्ह नव्हतं. माझ्याकडून चूक झाली, मला माफ करा असं महिलेने म्हटलं आहे. 

दरम्यान, राहुलच्या कुटुंबाशी संपर्क साधला असता ते आले आणि त्याला घेऊन गेले. त्याच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, राहुल एक महिन्यापूर्वी आपल्या घऱातून निघून गेला होता. ज्याची तक्रार पोलस ठाण्यात देण्यात आली होती. 

शुक्रवारी रुग्णालयाबाहेर काय झालं होतं?

मानसिक स्थिती योग्य नसणारा राहुल रुग्णालयाच्या बाहेर बसलेला होता. त्याचे केस आणि दाढी वाढलेली नव्हती. बरेच दिवस आंघोळ केली नसल्याने त्याचे कपडे मळलेले होते. तो जमिनीवर तशाच अवस्थेत बसलेला होता. महिलेचा हा आपला 10 वर्षांपूर्वी हरवलेला पती असल्याचा गैरसमज झाला. यानंतर ती त्याचे केस नीट करताना आणि अंगावरची घाण साफ करताना दिसत होती. 

महिला यावेळी तेथील स्थानिकांना हा आपला 10 वर्षांपूर्वी हरवलेला पती असल्याचं सांगते. तसंच त्याला इतके दिवस कुठे होतास? का निघून गेला होतास? असे प्रश्न विचारते. पण ती व्यक्ती काहीच बोलत नव्हती. फक्त शांतपणे बसली होती. 

यानंतर महिलेने मोबाइलवरुन घरी फोन केला आणि एक कुर्ता घेऊन येण्यास सांगितलं. एक तरुण काही वेळाने बाईकवरुन कुर्ता घेऊन येतो. नंतर ते दोघे त्याला बाईकवरुन घेऊन जातात.