5 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर पोत्यात भरलं अन्...; पोलिसांनीही मागितली कुटुंबाची माफी

Crime News: आरोपीने लैंगिक अत्याचार केल्यानंतर मुलीची गळा दाबून हत्या केली होती. यानंतर त्याने मुलीचा मृतदेह पोत्यात भरुन फेकून दिला होता. दुसऱ्या दिवशी आरोपी पोलिसांना घेऊन घटनास्थळी गेला असता मृतदेह हाती लागला.   

शिवराज यादव | Updated: Jul 30, 2023, 11:07 AM IST
5 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर पोत्यात भरलं अन्...; पोलिसांनीही मागितली कुटुंबाची माफी title=

Crime News: केरळच्या एर्नाकुलम (Ernakulam) येथे 5 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केल्यानंतर गळा दाबून हत्या (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्थलांतरित कामगाराने हे कृत्य केलं. इतकंच नाही तर त्याने हत्या केल्यानंतर मुलीचा मृतदेह पोत्यात भरुन फेकून दिला होता. दुसऱ्या दिवशी आरोपी घटनास्थळी घेऊन गेला असता मृतदेह हाती लागला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

पोलिसांनी आरोपीला शनिवारी रात्रीच बेड्या ठोकल्या होत्या. पण तो शुद्धीत नसल्याने पोलिसांना त्याच्याकडून माहिती मिळवण्यात उशीर झाला. यादरम्यान पोलिसांकडून रात्रभर सर्च ऑपरेशन सुरु होतं. 

बिहारमधील एका जोडप्याने आपली मुलगी बेपत्ता झाल्यची तक्रार पोलीस ठाण्यात केली होती. सीसीटीव्हीत आरोपी मुलीला उचलून नेत असल्याचं कैद झालं होतं. "सीसीटीव्ही फुटेजमध्ये आम्हाला अशफाक आलम मुलीला नेत असल्याचं दिसलं. तो मूळचा बिहारचा आहे. आम्ही रात्री 9.30 वाजता त्याला ताब्यात घेतलं. तो शुद्धीत नसल्यान आम्ही थोडा वेळ वाट पाहिली. नंतर आम्ही रात्रभर त्याची चौकशी करत होतो," अशी माहिती एर्नाकुलनचे पोलीस अक्षिकक (ग्रामीण) विवेक कुमार यांनी दिली आहे.

रविवारी सकाळी आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आणि पोलिसांना आपण जिथे मुलीला घेऊन गेलो होतो ती जागा दाखवली अशी माहिती पोलीस अधिक्षकांनी दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पीडित मुलीच्याच इमारतीत वास्तव्याला होता. ज्यूस घेऊन देतो सांगत तो मुलीला आपल्यासह घेऊन गेला होता. यानंतर त्याने तिच्यावर निर्घृणपणे लैंगिक अत्याचार केले. दलदलीच्या भागात मृतदेह फेकल्यानंतर त्याने तिचे शरीर झाकण्यासाठी कचरा आणि गोण्यांचा वापर केला, असे पोलिसांनी सांगितले.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी परप्रांतीय कामगाराला अटक केली होती. पण तो दारूच्या नशेत असल्याने चौकशीला उशीर झाला. अनेक स्थानिकांनीही मुलीला त्याच्यासह जवळच्या बाजारपेठेत पाहिल्याचं पोलिसांना सांगितलं होतं. यादरम्यान पोलीस आपल्या बाजूने सर्वोतपरी प्रयत्न करत होते. त्यांनी रात्रभर सर्च ऑपरेशन राबवलं. तसंच दुसरीकडे सोशल मीडियावरही अनेकजण तिच्या शोधासाठी मेसेज करत होते. 

दरम्यान केरळ पोलिसांनी मुलीची भेट करुन देण्यात अपयशी ठरल्याने सोशल मीडियावरुन कुटुंबाची माफी मागितली आहे. तसंच पोलीस प्रमुखांनी तपासात त्रुटी राहिल्याचे विरोधकांचे आरोप फेटाळले आहेत. मात्र या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.