पतीच्या IPL व्यसनाला कंटाळून पत्नीने उचललं टोकाचं पाऊल, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथे 18 मार्चला रंजिताचा राहत्या घरात लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, दर्शनने 1 कोटींचं कर्ज घेतलं होतं.   

शिवराज यादव | Updated: Mar 26, 2024, 03:38 PM IST
पतीच्या IPL व्यसनाला कंटाळून पत्नीने उचललं टोकाचं पाऊल, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड title=

आयपीएल स्पर्धा सुरु होताच सट्टेबाजारालाही वेग येतो. जसजशी स्पर्धा पुढे सरकते तसतसा हा सट्टाबाजार आणखी वेग पकडतो. पोलीस कारवाईत अशा अनेक सट्टेबाजांवर कारवाई केली जाते. पण सट्टेबाजीचं हे व्यसन अनेकदा संबंधितांच्या कुटुंबासाठी डोकेदुखी असते. कित्येकजण तर कर्ज काढून हा सट्टा लावत असतात. कर्नाटकमध्ये अशाच प्रकारे एका व्यक्तीने आयपीएलमध्ये सट्टा लावण्यासाठी तब्बल 1 कोटींचं कर्ज काढलं होतं. पण त्याच्या या सवयीला कंटाळून पत्नीने टोकाचं पाऊल उचललं. 

दर्शन बाबू इंजिनिअर असून त्याला सट्टेबाजीचं व्यसनच आहे. तो क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावत असून, 2021 पासून आयपीएलमध्ये पैसे गुंतवत होता. सट्टेबाजीत पैसे गमावल्यानंर किंवा नव्याने सट्टा लावण्यासाठी तो कर्ज घेत असे. दरम्यान कर्जदारांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्याच्या 23  वर्षीय पत्नीने आत्महत्या केली आहे. कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथे 18 मार्चला रंजिताचा राहत्या घरात लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, दर्शनने 1 कोटींचं कर्ज घेतलं होतं. 

दर्शन बाबू होसादुर्गा येथे लघु पाटबंधारे विभागात सहाय्यक अभियंता म्हणून काम करत होता. 2021 ते 2023 या कालावधीत तो आयपीएल सट्टेबाजीच्या जाळ्यात अडकला होता. त्याच्या या व्यसनाचा परिणाम कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर झाला.  त्याने सर्व पैसे गमावल्यानंतर सट्टा लावण्यासाठी 1.5 कोटीहून अधिक कर्ज घेतले होते. त्याने यातील 1 कोटी रुपये परत केले होते. पण तरीही अद्याप त्याच्यावर 84 लाखांचं कर्ज होतं. 

दर्शन बाबू आणि रंजिताचं 2020 मध्ये लग्न झालं होतं. 2021 मध्ये रंजिताला दर्शन बाबूच्या सट्टेबाजी व्यसनाबद्दल समजलं असा दावा तिचे वडील वेंकटेश यांनी केला आहे. व्यंकटेश यांनी तक्रारीत म्हटलं आहे की, कर्जदारांच्या सततच्या छळामुळे आपली मुलगी अत्यंत व्यथित होती आणि त्यामुळे तिने आत्महत्या केली. त्यांनी 13 जणांची नावंही सांगितली आहेत ज्यांनी कथितरित्या पैसे दिले होते. 

झटपट पैसे कमावण्याचं आमिष दाखवत आपल्या जावयाला सट्टेबाजीत ओढल्याचा दावा वेंकटेश यांनी केला आहे. ते म्हणाले की, "दर्शनची सट्टेबाजी करण्याची इच्छा नव्हती. पण संशयितांनी त्याला लवकर श्रीमंत होण्याचं आमिष दाखवत यात ओढलं. त्यांनी त्याच्याकडून काही कोऱ्या धनादेशांवर स्वाक्षरी घेत सट्टेबाजीसाठी पैसा पुरवण्याचं आश्वासन दिलं".

पोलिसांना तपासदरम्यान सुसाईड नोट सापडली आहे. यामध्ये रंजिताने आपला छळ झाल्याचं सविस्तरपणे सांगितलं आहे. दर्शन आणि रंजिता यांना 2 वर्षांचा मुलगा आहे.