वर्गातच विद्यार्थिनीचा लैंगिक छळ, शिक्षक पँट काढून समोर उभा राहिला अन्...; CCTV त कैद झाली घटना

मुलगी शाळेत जाण्यास नकार देत असल्याने कुटुंबीयांनी विचारणा केली. यावेळी मुलीने जे सांगितलं ते ऐकून त्यांना धक्काच बसला. यानंतर त्यांनी तात्काळ शाळेच्या मुख्याध्यापकांना घटनेची माहिती दिली. तसंच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.   

शिवराज यादव | Updated: Nov 8, 2023, 06:18 PM IST
वर्गातच विद्यार्थिनीचा लैंगिक छळ, शिक्षक पँट काढून समोर उभा राहिला अन्...; CCTV त कैद झाली घटना title=

उत्तर प्रदेशातील मथुरा येथे शाळेतच शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंगावरील कपडे काढलेल्या शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत जबरदस्ती केली. वर्गातील सीसीटीव्हीत हा सगळा प्रकार कैद झाला आहे. घटना समोर आल्यानंतर आरोपी शिक्षक फरार झाला आहे. पीडित मुलीने कुटुंबासह पोलीस स्थानक गाठत तक्रार दाखल केली आहे. शिक्षकाचा शोध घेतला जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 

कोसीकला पोलीस ठाणे क्षेत्राच्या सरकारी शाळेत ही घटना घडली आहे. नववीत शिकणारी ही विद्यार्थिनी दोन दिवसांपासून शाळेत जात नव्हती. कुटुंबीयांनी शाळेत जाण्यास सांगितलं असता ती घाबरली आणि नकार दिला. यावेळी कुटुंबीयांनी तिच्याकडे चौकशी केली असता तिने जे सांगितलं ते ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. 

मुलीने सांगितला घटनाक्रम

विद्यार्थिनीने सांगितलं की, शाळेतील गोविंद नावाच्या शिक्षकाने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. 6 नोव्हेंबरला ती शाळेत गेली असता गोविंद कपडे काढून तिच्यासमोर उभा राहिला.  यानंतर त्याने मुलीला जवळ ओढून घेतलं आणि अश्लील कृत्य करु लागला. 

मुलीने घटनाक्रम सांगितल्यानंतर कुटुंबाने शाळेच्या मुख्याध्यापकांकडे धाव घेतली. यानंतर मुख्याध्यापकांनी वर्गातील सीसीटीव्हीचं फुटेज तपासलं. सीसीटीव्हीत आरोपी शिक्षक कपडे काढून क्लासरुममध्ये उभा असल्याचं दिसत आहे. तसंच काही अंतरावर पीडित मुलगी उभी होती. अश्लील चाळे करत गोविंद विद्यार्थिनीला पकडतो आणि नंतर जबरदस्ती करु लागतो. घाबरलेली मुलगी स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करते. ती गोविंदसमोर हात जोडून आपल्याला जाऊ देण्याची विनंती करते. 

आरोपी शिक्षकाने आपल्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला असा आरोप पीडित मुलीने केला आहे. मी विरोध केला असता शिक्षकाने अॅसिड टाकून जाळून टाकेन अशी धमकी दिल्याचंही मुलीने सांगितलं आहे. 

आरोपी शिक्षकाचा शोध सुरु

पीडित मुलीच्या कुटुंबाने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्कार दाखल केली आहे. आरोपी शिक्षक सध्या फरार आहे. एसपी देहात त्रिगुण वशन यांनी सांगितलं आहे की, एफआयआर दाखल केला असून आरोपी शिक्षकाला अटक करण्यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहेत.