शाळेतला शिक्षक आवडला! घरच्यांनी थेट अपहरण करुन मुलीसोबत लग्न लावून दिलं, नंतर दोघांना...

बिहारमध्ये नव्यानेच नियुक्त झालेल्या गौतम कुमार या शिक्षकाचं अपहरण करण्यात आलं. इतकंच नाही तर अपहरणकर्त्यांनी बंदुकीचा धाक दाखवत त्याचं मुलीशी लग्न लावून दिलं.   

शिवराज यादव | Updated: Dec 2, 2023, 05:43 PM IST
शाळेतला शिक्षक आवडला! घरच्यांनी थेट अपहरण करुन मुलीसोबत लग्न लावून दिलं, नंतर दोघांना... title=

बिहारच्या हाजीपूरमध्ये एका बीपीएससी शिक्षकांच चक्क शाळेतून अपहरण करत लग्न लावून देण्यात आलं. या भागात नवरदेवांचं अपहरण केलं जात असल्याच्या घटना ताज्या असतानाच हा प्रकार घडला आहे. शिक्षकाचं अपहरण केल्यानंतर अपहरणकर्त्यांनी आपल्या मुलीशी बंदुकीचा धाक दाखवत त्याचं लग्न लावून दिलं. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत नवरीमुलीच्या काकाला बेड्या ठोकल्या आहेत. तर दुसरीकडे पीडित शिक्षकानेही तिच्यासोबत नातं ठेवण्यास नकार दिला आहे. आपलं लग्न जबरदस्ती करण्यात आल्याने बदनामी झाल्याचं त्याचं म्हणणं आहे. 

पातेपूर येथे नवरीमुलीच्या कुटुंबाने शाळेत तैनात असलेल्या गौतमचं मारहाण करत अपहरण केलं होतं. यानंतर त्याचं जबरदस्ती लग्न लावून देण्यात आलं होतं. या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

लग्नावरुन झालेल्या वादानंतर हाजीपूर पोलिसांनी अपहरण झालेल्या शिक्षकाची सुटका केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी नवरीमुलीच्या काकाला अटक केली आहे, जो अपहरणात सहभागी होता. विशेष म्हणजे अपहरण केल्याचं मान्य केल्यानंतरही आपण निर्दोष असल्याचा त्यांचा दावा आहे. आपण गौतमच्या कुटुंबीयांशी लग्नाबद्दल बोललो होतो, पण त्यांनी नकार दिला असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

अतिशय फिल्मी स्टाइलने शिक्षकाचं अपहरण झाल्याची माहिती पोलिसांनी कारवाई केली नसल्याचा आरोप केला जात आहे. पोलीस छापेमारी करत असल्याचे दावे करत असताना अपहरणकर्ता मात्र नवरा आणि नवरीमुलीला सहजपणे पोलीस ठाण्यात सोडून रवाना झाले. 

पीडित शिक्षक गौतमने सांगितलं आहे की, शाळेच्या वेळेत माझं अपहरण करण्यात आलं आणि मारहाणही करण्यात आली. आधी 2 लोक शाळेत आले आणि मुख्याध्यापकांना भेटण्याचा बहाणा करत मला जबरदस्ती गाडीत बसवलं. यानंतर मारहाण करत जबरदस्ती बंदुकीचा धाक दाखवत माझं लग्न लावण्यात आलं. यावेळी माझा मोबाईल काढून घेण्यात आला होता. यानंतर मी पेनाने माझ्या शर्टावर जबरदस्ती लग्न केलं जात असल्याचं लिहिलं. 

पुढे त्याने सांगितलं आहे की, "अपहरण केल्यानंतर जवळपास 2.30 वाजता अपहरणकर्ता आपल्याला महिसौर पोलीस ठाण्यात सोडून गेले. सोबत मुलगी आणि तिची आईही होती. पीडित शिक्षकाने म्हटलं आहे की, माझा फोटो व्हायरल करुन बदनामी केली आहे. माझी प्रतिमा खराब झाली आहे. मी हे लग्न मानत नाही आणि तिच्यासोबत राहणार नाही. माझी शाळा मुलीच्या घऱाजवळ असून भीती वाटत आहे".