एकटा पोलीस अधिकारी 7 दरोडेखोरांना भिडला, 4 कोटींचा दरोडा फसला; शूटआऊटचा LIVE व्हिडीओ

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) एका पोलीस अधिकारी एकटा सात दरोडेखोरांना भिडला आणि 4 कोटींचा दरोडा रोखला. सीसीटीव्हीत (CCTV) पोलीस अधिकारी आणि दरोडेखोरांमध्ये झालेली चकमक कैद झाली आहे. यानंतर पोलीस अधिकाऱ्याने दाखवलेल्या शौर्याचं कौतुक होत आहे.   

शिवराज यादव | Updated: Jun 11, 2024, 08:20 PM IST
एकटा पोलीस अधिकारी 7 दरोडेखोरांना भिडला, 4 कोटींचा दरोडा फसला; शूटआऊटचा LIVE व्हिडीओ title=

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) पोलीस अधिकाऱ्याने दाखवलेली हिंमत आणि प्रसंगावधान यामुळे ज्वेलरी शॉपवरील 4 कोटींचा दरोडा फसला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या या घटनेत पोलीस अधिकारी एकटा 7 दरोडेखोरांना भिडला. दुकानाच्या बाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत पोलीस उपनिरीक्षक मेघनाद मोंडल आणि दरोडेखोरांमध्ये झालेली चकमक कैद झाली आहे. यावेळी पोलीस अधिकारी चक्क एका वीजेच्या खांबामागे लपून दरोडेखोरांचा सामना करत असल्याचं दिसत आहे. पश्चिम बंगाल पोलिसांनी एक्सवर सगळा घटनाक्रम शेअर केला असून, यावेळी 20 गोळ्या झाडण्यात आल्याचं सांगितलं आहे. अखेर पोलीस अधिकाऱ्यासमोर गुडघे टेकत दरोडेखोर लुटीचा अर्धा माल मागेच सोडून पळून गेले. पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या असून, इतर फरार आहेत. 

रविवारी संध्याकाळी ही घटना घडली, जेव्हा तोंडावर मास्क घालून सात शस्त्रधारी दरोडेखोर ज्वेलरी शॉपमध्ये घुसले. त्यांच्या हातात यावेळी बंदुका, मशीन गन्स होत्या. दरोडेखोर दुकानात घुसल्यानंतर मालक आणि ग्राहकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. त्यांनी काही मिनिटातच 4 कोटींचे दागिने जमा केले. 

दरोडा टाकल्यानंतर त्यांना अत्यंत सहजपणे पळ काढता आला असता. पण त्यांच्या दुर्दैवाने पोलीस उपनिरीक्षक मेघनाद मोंडल आपल्या वैयक्तिक कामासाठी त्याच परिसरात होते. ते साध्या कपड्यात होते, पण जवळ सर्व्हिस रिव्हॉल्वर होती. ज्वेलरी शॉपबाहेरील लोकांचे चेहरे आणि धावपळ पाहून त्यांना काहीतरी गडबड सुरु असल्याचं लक्षात आलं.

मेघनाद मोंडल यानंतर तिथे एका वीजेच्या खांबाजवळ लपले आणि आपली रिव्हॉल्वर अनलॉक केली. यादरम्यान गेटवर सुरक्षा देणाऱ्या एका दरोडेखोराची त्यांच्यावर नजर पडली. त्याने आपल्या सहकाऱ्यांना अलर्ट केला आणि गोळीबार सुरु केला. यानंतर पुढील 30 सेकंद पोलीस अधिकारी आणि दरोडेखोरांमध्ये चकमक सुरु होती. यादरम्यान पोलीस अधिकारी अजिबात मागे हटला नाही. त्याने झाडलेली एक गोळी एका दरोडेखोरालाही लागली आणि खाली कोसळला. यादरम्या इतर दरोडेखोर पोलीस कर्मचाऱ्यावर गोळ्यांचा वर्षाव करत होते. 

अखेर आपण पकडले जाणार हे लक्षात आल्यानंतर दरोडेखोर घटनास्थळावरुन पळ काढतात. पोलीस अधिकाऱ्याच्या शौर्यापुढे गुडघे टेकत सर्वजण आपल्या बाईकवरुन पळून जातात. यावेळी ते आपल्या जखमी सहकाऱ्यालाही बाईकवर बसण्यास मदत करतात. पळून जाण्याच्या घाईत ते 2.5 कोटींचे दागिने, दोन बॅकपॅक आणि 42 काडतूसं मागेच सोडतात. 

पण पोलीस अधिकारी त्यानंतर त्यांचा पिच्छा सोडण्यास तयार नसतो. तो त्यानंतर त्यांचा पाठलाग करत गोळीबार करत राहतो. यानंतर तो पोलिसांनी फोन करुन घटनेची माहिती देतो. शेजारच्या झारखंड राज्यातही यानंतर अलर्ट पाठवण्यात येतो. 

दुसरीकडे दरोडेखोर एका चारचाकीच्या चालकावर गोळीबार करुन कार हायजॅक करतात. चालक आणि काही पादचारी गोळीबारात जखमी होतात. दुसरीकडे झारखंड पोलीसही कारवाई सुरु करतात. ते कार जप्त करता आणि दरोड्यात सहभागी सूरज सिंगला अटक करतात. पुढील तपासात पोलीस जखमी झालेला दरोडोखेर सोनू सिंगपर्यंत पोहोचतात. त्याला बिहारच्या सिवान येथून अटक करण्यात आली. पोलिसांनी दोघांच्या चौकशीतून इतरांनाही अटक केली जाईल आणि चोरीचा माल मिळवला जाईल असा विश्वास व्यक्त केला आहे.