Crime News: राजधानी दिल्लीत एका व्यक्तीचं त्याच्या दोन मुलींसह अपहरण करण्यात आलं. गौतम बुद्ध नगर येथे दिवसाढवळ्या रस्त्यावरुन हे अपहरण करण्यात आलं. पण अपहरण करणाऱ्यांनी पळून जाताना कार एका ट्रकला ठोकली आणि त्यांचा सगळा प्लान फसला. कारचा अपघात झाल्यानंतर गर्दी जमा झाल्याने अपहरणकर्त्यांनी पळ काढला आणि पीडितांची सुटका झाली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरु आहे. पोलिसांनी चारही अपहरणकर्त्यांची ओळख पटवली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष कश्यप आपला मुलगा आणि मुलीला शाळेतून घरी जात होते. ते रस्त्यात असतानाच त्यांच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला. अपहरणाचा प्रयत्न करणारे चारही तरुण होते. त्यांची ओळख पटवण्यात आली आहे.
सुभाष कश्यप यांनी पोलीस तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, सुरजापूर मुख्य बाजारपेठेत ब्रेझा एसयुव्हीमधून आलेल्या अपहरणकर्त्यांनी आम्हाला रोखलं. ते आमच्या स्कॉर्पिओ एसयुव्हीमध्ये घुसले आणि माझ्यासह मुलांचं अपहरण केलं.
अपहरणकर्त्यांनी सुभाष कश्यप यांना मारहाण केली आणि स्कॉर्पिओमधून नेण्याचा प्रय्न केला. सुभाष कश्यप यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना दादरी येथे नेलं जात होतं. पण 500 मीटर अंतरावर त्यांच्या कारने समोरील ट्रकला धडक दिली. मार्केट असल्याने या ठिकाणी लोकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ होती. अपघातानंतर लोक गाडीच्या बाजूला जमा झाले. यानंतर भीतीपोटी अपहरणकर्ते गाडीतून बाहेर काढले आणि पळ काढला. परिसरातील सीसीटीव्हीत अपहरणकर्ते पळून जाताना कैद झाले आहेत.
सुभाष कश्यप यांनी दिलेल्या माहितीनुसार, "कारमधून जात असताना माझ्यासह मुलांनाही मारहाण करण्यात आली. त्याचवेळी गाडीने ट्रकला धडक दिली आणि ट्राफिकमध्ये अडकली. यानंतर मी आरडाओरड करत लोकांचं लक्ष वेधून घेतलं. यानंतर अटकेच्या भीतीपोटी आरोपींनी पायीच पळ काढला".
सुभाष कश्यप यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीत सुभाष कश्यप यांनी अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या चौघांपैकी दोघांना आपण ओळखत असल्याची माहिती दिली आहे. त्यांची नावं रोहित आणि आकाश असून गेल्या अनेक काळापासून त्यांच्यात वैर आहे. दोन महिन्यांपूर्वी त्यांचं भांडण झालं होतं.
सुभाष कश्यप यांच्या भावाने आरोप केला आहे, आरोपी त्याला दूर घेऊन जात होते. कदाचित त्यांनी त्याची हत्या केली असती. दरम्यान नोएडाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अनिल यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष कश्यप हे सूरजापूर येथे वास्तव्यास असून त्यांची मुलं केसीएस इंटर कॉलेजमध्ये शिकतात. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
सुभाष कश्यप किरकोळ जखमी झाले आहेत. “आम्ही परिसरातील सीसीटीव्ही फुटेज गोळा करत आहोत आणि सर्व बाजूंनी प्रकरणाचा तपास करत आहोत. सुभाष कश्यप यांच्यावर उपचार केले असून त्यांची मुलं सुखरूप आहेत. कश्यप यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे, सूरजपूर पोलिस स्टेशनमध्ये सिंह, आकाश आणि इतर दोन अज्ञात लोकांविरुद्ध कलम 341, 323 आणि 364 अंतर्गत मारहाण आणि अपहरणाचा गुन्हा दाखळ करण्यात आला आहे," अशी माहिती डीसीपींनी दिली आहे.