'माझा मुलगा विकायचा आहे,' गळ्यात पाटी घालून पत्नी आणि मुलांसह चौकात बसला बाप; कारण हैराण करणारं

एका हतबल पित्याने चक्क आपल्या मुलालाच विकायला काढलं आहे. पिता गळ्यात पाटी घालून चौकात आपल्या पत्नी आणि मुलांसह बसला आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 27, 2023, 05:49 PM IST
'माझा मुलगा विकायचा आहे,' गळ्यात पाटी घालून पत्नी आणि मुलांसह चौकात बसला बाप; कारण हैराण करणारं title=

उत्तर प्रदेशच्या अलीगड येथील एका घटनेमुळे सध्या खळबळ माजली आहे. येथील एक व्यक्ती आपल्या पत्नी दोन मुलांसह गळ्यात पाटी घालून चौकात बसला आहे. गळ्यातील पाटीवर त्याने लिहिलं आहे की, "माझा मुलगा विक्रीसाठी उपलब्ध आहे, मला माझा मुलगा विकायचा आहे". मिळालेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती कर्जाखाली अडकली आहे. तसंच वसुलीमुळे कंटाळून त्याने हे पाऊल उचललं आहे. 

अलीगढ पोलीस ठाण्याच्या महुआखेडा परिसरातील हे प्रकरण आहे. निहार मीरा शाळेजवळ राहणाऱ्या राजकुमार यांचा आरोप आहे की, त्याने संपत्ती खरेदी करण्यासाठी काही लोकांकडून पैसे उधार घेतले होते. पण पैसे देणाऱ्यांनी हेराफेरी करत त्याला कर्जाच्या ओझ्याखाली ढकललं. इतकंच नाही तर त्यांनी पैसे वसूल करण्यासाठी त्याच्या संपत्तीची कागदपत्रं बँकेत ठेवून कर्ज काढलं. आता पीडित व्यक्तीकडे संपत्ती तर नाही, पण कर्जाचं ओझंही आहे. 

'ना संपत्ती मिळाली, ना हाती पैसे आले'

राजकुमार यांचं म्हणणं आहे की, ना त्यांना संपत्ती मिळाली, ना हाती पैसा आला आहे. पण यानंतरही कर्ज देणारे त्यांच्यावर वसुलीसाठी दबाव आणत आहेत. राजकुमार यांचा आरोप आहे की, कर्जदारांनी त्यांची ई-रिक्षाही काढून घेतली आहे. याच रिक्षावर त्यांचा उदरनिर्वाह होत होता. 

राजकुमार यांच्या म्हणण्यानुसार, आता त्यांच्यावर आपल्या मुलाला विकण्याची वेळ आली असून, त्यासाठी बस स्टँड चौकात बसावं लागलं आहे. राजुकमार चौकात आपली पत्नी, मुलगा आणि एका लहान मुलीसह येऊन बसल्यानंतर परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. 'जर माझ्या मुलाला 6 ते 8 लाखात कोणी खरेदी केलं, तर किमान माझ्या मुलीच्या शिक्षणाचा खर्ज मी उचलू शकेन. तिचं लग्न लावून देईन आणि कुटुंबाचं पालन करु शकेन,' असं राजकुमार म्हणाले आहेत. 

स्थानिक पोलिसांकडे गेलो असता आपल्याला कोणतीही मदत केली नसल्याचा आरोप राजकुमार यांनी केला आहे. त्यामुळे मजबुरीत आपल्याला हे पाऊल उचलावं लागलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण यानंतर अर्ध्या तासात गांधी पार्क पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि राजकुमारसह त्याच्या कुटुंबाला घेऊन गेली. यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या लोकांना पोलीस ठाण्यात बोलावून समजूत घालत प्रकरण मिटवलं.