मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) एक धक्कादायक घटन घडली आहे. सागर जिल्ह्यात एका दलित (Dalit) तरुणाची मारहाण करत हत्या करण्यात आली. इतकंच नाही तर आपल्या मुलीला वाचवण्यासाठी पोहोचलेल्या त्याच्या आईला निर्वस्र करण्यात आलं. नंतर महिलेलाही बेदम मारहाण कऱण्यात आली. आरोपींनी काही दिवसांपूर्वी मृत तरुणाच्या बहिणीची छेड काढली होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी पीडित कुटुंबावर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकत होतं. यानंतर बीएसपी, काँग्रेस यांच्याकडून भाजपावर जोरदार टीका केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खुरई देहात पोलीस ठाणे क्षेत्रातील बरोदिया नौनगिर येथे ही घटना घडली आहे. येथे गुरुवारी रात्री काही जणांनी दलित तरुणाची मारहाण करत हत्या केली. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या तरुणाच्या आईला निर्वस्त्र करण्यात आलं. घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी एकूण 13 जणांविरोधात हत्या तसंच इतर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी मुख्य आरोपीसह 8 जणांना अटक केली आहे.
या हत्येत सहभागी सरपंचासह पती आणि इतर आरोपी फरार आहेत. तसंच घटनेनंतर गावात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. जिल्हाधिकारी दीपक आर्य घटनास्थळी दाख झाले होते. दरम्यान, घटनेनंतर मृत तरुणाच्या कुटुंबीयांमध्ये रोष आहे. जवळपास 40 तास त्यांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले नाहीत. आपल्या 10 मागण्यांवर आश्वासन मिळाल्यानंतरच त्यांनी अंत्यसंस्कार केले. आरोपींच्या घऱावर बुलडोझर चालवला जावा अशी मृत तरुणाच्या कुटुंबीयांची मागणी आहे.
मृत तरुणाच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, "गावातील विक्रम सिंह, कोमल सिंह आणि आझाद सिंह घरी आले होते. ते आईला तक्रार मागे घेण्यास सांगू लागले. पण आईने कोर्टात हजर केल्याशिवाय तक्रार मागे घेणार नाही सांगितलं. यावर ते तुझ्या मुलांचा जीव प्रिय नाही का? अशी धमकी देऊ लागले. यानंतर मुलगा जिथे भेटेल तिथेच त्याचा निकाल लावू असं धमकावून ते बाहेर पडले. माझा छोटा भाऊ बस स्टँडजवळ भाजी आणण्यास गेला होता. तो घऱी येत असताना आरोपी त्याला रस्त्यात मारहाण करु लागले. तो पळू जात असताना त्याला पकडलं आणि मारहाण केली".
"आईने बाजाराच्या दिशेने गेली असता तिला मारहाण होत असल्याचं दिसलं. यानंतर ती मधे पडली असता आरोपींनी तिलाही मारहाण केली. मी पोलिसांना फोन केला असता, त्यांनी फोन खेचून घेतला. त्यांनी मलाही मारहाण केली. मी हाता, पाया पडली पण त्यांनी मला सोडलं नाही," असं तिने सांगितलं आहे.
पुढे तिने सांगितलं की, "आरोपींनी आई आणि भावाला खूप मारहाण केली. यानंतर मी तेथून पळ काढला. त्यांनी माझा पाठलाग केला असता मी जंगलात जाऊन लपली. आरोपींनी याआधी माझ्याशी छेडछाड केली होती. तसंच तक्रार करायची तर कर असंही म्हणाले होते. आईला निर्वस्त्र केलं तेव्हा तिथे 70 लोक होते. भाऊ बेशुद्ध पडला होता. यानंतर ते पळून गेले".
पोलिसांनी 41 वर्षीय मुख्य आरोपी विक्रम सिंह ठाकूर, 36 वर्षीय आझाद ठाकूर, 37 वर्षीय इस्लाम खान, 36 वर्षीय गोलू उर्फ सुशील कुमार सोनी, 28 वर्षीय अनीश खान, 22 वर्षीय गोलू उर्फ फरीम खान, 28 वर्षीय अभिषेक रैकवार आणि 19 वर्षीय अरबाज खानला अटक केली आहे. हे सर्व बडोदिया नौनागीर येथील रहिवासी आहेत. फरार आरोपी कोमलसिंग ठाकूर आणि इतरांचा पोलीस शोध घेत आहेत.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले आहेत की, "मध्य प्रदेशातील सागरमध्ये एका दलित तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. गुंडांनी त्याच्या आईलाही सोडले नाही. सागरमध्ये संत रविदास मंदिर बांधण्याचे नाटक करणारे पंतप्रधान मध्य प्रदेशात सातत्याने होत असलेल्या दलित-आदिवासी अत्याचारावर पाहतही नाहीत. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री केवळ कॅमेरासमोर वंचितांचे पाय धुवून आपला गुन्हा लपवण्याचा प्रयत्न करतात".
"भाजपने मध्य प्रदेशला दलित अत्याचाराची प्रयोगशाळा बनवले आहे. भाजपशासित मध्य प्रदेशात दलितांवरील गुन्ह्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे, जे राष्ट्रीय सरासरीच्या तिप्पट आहे. मोदीजी, यावेळी मध्य प्रदेशातील जनता भाजपच्या फंदात पडणार नाही. समाजातील वंचित आणि शोषित घटकांच्या व्यथांचं उत्तर तुम्हाला काही महिन्यांनंतर मिळेल. भाजपचे जाणे निश्चित आहे," अशी टीकाही त्यांनी केली आहे.