Swami Chakrpani On Moon: चांद्रयान-3ने 23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 6 वाजून 04 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिग केले. चांद्रयान-३ने यशाला गवसणी घालताच भारतात जल्लोष साजरा केला जात आहे.अशातच ज्या ठिकाणी चांद्रयान-3ची लँडिग झाली ज्या जागेला शिवशक्ती पॉइंट नावाने ओळखले जाणार आहे. देशभरात सध्या चांद्रयानची चर्चा असतानाच अखिल भारत हिंदू महासभा/ संत महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी एक आश्चर्यचकित करणारे विधान केले आहे.
स्वामी चक्रपाणी यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओत त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे एक मागणी केली आहे. चं'द्राला हिंदू सनातन राष्ट्र म्हणून संसदेत घोषित करा. त्याचबरोबर जिथे चांद्रयान-3 ची सॉफ्ट लँडिग झाली त्या शिवशक्ती पॉइंटला राजधानी म्हणून विकसित करा. जेणेकरुन कोणी दहशतवादी किंवा जिहादी मानसिकता असलेले तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही,' असं स्वामी चक्रपाणी यांनी म्हटलं आहे.
स्वामी चक्रपाणी यांनी व्हिडिओत पुढे म्हटलं आहे की, 'मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी चांद्रयान-३ ज्या ठिकाणी उतरले त्या स्थानाला शिवशक्ती पॉइंट नाव दिले आणि तशी घोषणा केली. त्याचबरोबर मी अशी मागणी करतो की, कोणत्या अन्य विचारधारेचे आणि देशाचे लोक चंद्रावर जाऊ नये. यासाठी संसदेत एक प्रस्ताव पारित करावा. यात चंद्राला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्यात यावे तसंच, शिवशक्ती पॉइटच्या जागी राजधानी वसवण्यात यावी'.
स्वामी चक्रपाणी म्हणाले की, 'इतर कोणी तेथे (चंद्र) जाऊन तेथे जाऊन कट्टरतावादी विचारसरणीचा प्रसार, दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी चंद्राला हिंदु सनातन राष्ट्र म्हणून घोषित करावे. त्याची राजधानी शिवशक्ती पॉइंट असावी, कारण चंद्राला भगवान शंकरानी त्यांच्या मस्तकावर धारण केले आहे. हिंदू धर्मियांचे चंद्राशी खूप जुने नाते आहे. आपल्या धर्मग्रंथांमध्ये चंद्राचे अनेक संदर्भ आहेत. चंद्राची शुद्धता आणि पावित्र्य राखले जावे असे मला वाटते. त्यामुळेच प्रस्ताव आणून चंद्राला हिंदु सनातन राष्ट्र म्हणून घोषित करावे.'