पाणी बॉटल : २१ रूपयांचा मोह मुदलासह १२,००० रूपयांना पडला

पाण्याच्या बॉटलची वाढीव किंमत सांगून ग्राहकाकडून पैसे उकळण्याचा प्रकार दुकानदाराच्या चांगलाच अंगाशी आला. या दुकानदाराला २१ रूपयांचा मोह मुदलासह १२,००० रूपयांना पडला. 

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 26, 2017, 11:57 AM IST
पाणी बॉटल : २१ रूपयांचा मोह मुदलासह १२,००० रूपयांना पडला title=

बंगळुरू : पाण्याच्या बॉटलची वाढीव किंमत सांगून ग्राहकाकडून पैसे उकळण्याचा प्रकार दुकानदाराच्या चांगलाच अंगाशी आला. या दुकानदाराला २१ रूपयांचा मोह मुदलासह १२,००० रूपयांना पडला. 

'जागो ग्राहक जागो'चा प्रत्यक्षात वापर करत राघवेंद्र केपी नावाच्या बंगळुरूतील एका ग्राहकाने जीएस एंटरप्रायजेसच्या रॉयल मीनाक्षी मॉल आणि नर्माता कोका-कोलाला ग्राहक न्यायालयात खेचले. राघवेंद्रने Kinley मिनरल वॉटर कंपनीची एक लिटर पाण्याची बॉटल खरेदी केली होती. ही खरेदी करताना राघवेंद्रला २१ रूपये जादा खर्च करावे लागले. राघवेंद्रने न्यायालयात सांगितले की, आपण ५ डिसेंबर २०१५ ला दुकानदराकडून १ लिटर पाण्याची बॉटल ४० रूपयांना खरेदी केली. पण, त्यावर एमारपी रक्कम १९ रूपये इतकीच होती.

राघवेंद्रने असाही दावा केला की, याच कंपनीची पाण्याची बॉटल मी जयानगर इथल्या दुकानातून खरेदी केली. ती मला १९ रूपयंनाच मिळाली. दोन्ही पाणी बॉटल खरेदी केल्याच्या पावत्या त्याने न्यायालयाला सादर केल्या. तसेच, रॉयल मीनाक्षी मॉलमध्ये खरेदी केल्यामुळे मला २१ रूपयांचे नुकसान झाले. कोका-कोलानेही राघवेंद्रचा हा दावा मान्य केला आणि ग्राहकाकडून अधिक पैसे उकळण्यासाठी त्याने चुकीचा दर लावला असे म्हटले.

सन २०१६च्या सुरूवातीला या प्रकरणाची न्यायालयात सुनावनी सुरू झाली होती. शेवटच्या सुनावनीवेळी दुकानदारही न्यायालयात उपस्थित होता. ग्राहकाने आपल्यावर चुकीचा आरोप लावल्याचा त्याचा दावा होता. पण, न्यायालयाने ग्राहकाच्या बाजूने निकाल देत २१ रूपयांचे नुकसान झाल्याचे म्हटले. न्यायालयाने निर्णय दिला की, दुकानदाराने पाणी बॉटलच्या मूळ शुल्कासह १२,००० रूपायंचा मोबदला ग्राहकास (राघवेंद्र) द्यावा. ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी ग्राहक न्यायालयाचा हा निकाल महत्त्वपूर्ण मानला जात आहे.