Delhi Robbery: राजधानी दिल्लीत प्रगती मैदान बोगद्यातील (Pragati Maidan Tunnel) दरोड्यानंतर खळबळ माजलेली असतानाच आणखी एक चोरी झाली आहे. काश्मिरी गेट (Kashmiri Gate) परिसरात एका व्यावसायिकाला लुटण्यात आलं आहे. मंगळवारी संध्याकाळी एका व्यावसायिकाकडून 4 लाख लुटण्यात आले. 24 जून रोजी प्रगती मैदान बोगद्यात दिवसाढवळ्या घालण्यात आलेल्या दरोड्याची घटना ताजी असतानाच आता हे प्रकरण समोर आल्याने खळबळ माजली आहे. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.
प्रगती मैदान (Pragati Maidan) परिसरात 24 जून रोजी दिवसाढवळ्या दरोडा टाकण्यात आला. पोलीस आणि क्राइम ब्रांचने (Crime Branch) याप्रकरणी 7 आरोपींना अटक केली आहे. या चोरीत सहभागी झालेल्या आरोपींना बेड्या ठोकल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला आहे. कारण हे सराईत गुन्हेगार नसून सर्वसामान्य नागरिक आहेत. आरोपींमध्ये डिलिव्हरी बॉय, नाभिक, भाजी विक्रेता आणि मेकॅनिक यांचा सहभाग आहे. या सर्वांनी मिळून काही दिवसांपूर्वी रेकी केली होती. यानंतर 24 जूनला त्यांनी चोरी कऱण्याचा कट आखत तो फत्ते केला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर 26 जूनला समोर आली होती.
Crime News: दिल्लीतील दरोड्याचा अखेर छडा लागला; पण आरोपींना पाहून पोलीसही चक्रावले, भाजी विकणारा..
दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषद घेत कारवाईची माहिती दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, 24 जूनच्या आदल्या रात्री 4 जणांनी प्रगती मैदान बोगद्यात दरोडा टाकण्याचा कट आखला. याप्रकरणी क्राइम ब्रांच आणि दिल्ली पोलिसांनी संयुक्तपणे छापेमारी सुरु केली होती. आरोपींना पकडण्यासाठी हरियाणा, उत्तर प्रदेशात छापेमारी करण्यात आली आणि 7 जणांना अटक केलं.
प्रगती मैदानातील दरोड्याच्या रकमेवरुन सध्या संशय व्यक्त होत आहे. याचं कारण पोलिसांकडे तक्रार करताना 2 लाखांची लूट झाल्याचं सांगण्यात आलं होतं. पण पोलिसांनी 5 लाख जप्त केले आहेत. क्राइम ब्रांचने याप्रकरणी तक्रारदाराशी बोलून स्पष्टता आणली जाईल असं सांगितलं आहे. दोन आरोपींवर पैसे घेऊन पळून गेल्याचा आरोप आहे. महत्त्वाचं म्हणजे, लुटण्यात आलेली रक्कम 50 लाखांपर्यत असू शकते. याप्रकरणी तपास सुरु आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपींची चौकशी केली असताना रक्कम तक्रारीत उल्लेख आहे त्यापेक्षा जास्त होती असं समोर आलं आहे. ही रक्कम 50 लाखांपर्यंत असावी अशी शंका आहे. फरार आरोपींना अटक केल्यानंतरच नेमकी किती रक्कम होती हे उघड होईल. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.