भारतात आलेल्या 7 चित्यांची 'ही' आहेत नावं; पंतप्रधानी ठेवलंय खास नाव

चित्त्यांच्या नामकरणावरुनही चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे

Updated: Sep 21, 2022, 11:48 PM IST
भारतात आलेल्या 7 चित्यांची 'ही' आहेत नावं; पंतप्रधानी ठेवलंय खास नाव title=

मध्य प्रदेश : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PMModi) यांच्या वाढदिवशी मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) कुनो नॅशनल पार्कमध्ये (Kuno National Park) आफ्रिकेच्या नामिबियामधून 8 चित्ते (cheetah) आणण्यात आले आहेत. या चित्त्यांच्या आगमनानंतर देशात राजकारण सुरु झालं आहे. अशातच या चित्त्यांच्या (cheetah)नामकरणावरुनही चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळालं.

अशातच या चित्त्यांच्या नावाबाबतची चर्चा थांबल्याचं पाहायला मिळत आहे. 8 पैकी सात चित्ते (cheetah) नामिबियाच्या नावाने ओळखले जातील. आतापर्यंत एका चित्त्याप्रमाणे (cheetah) इतर चित्यांची नावेही बदलली जातील, अशी चर्चा सुरु होती. पण, आता उर्वरित सात चित्ते त्यांच्या नामिबियन नावानेच ओळखले जातील. यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

वन संरक्षक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नामिबियात चित्त्यांचं जे नाव होतं, तेच नाव इथेही राहील. येथे फक्त एका मादी चित्त्याचे नामकरण करण्यात आलं आहे. हे नावही त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. या मादी चित्त्याच्या पिल्लांना भारतीय नावे देण्यात येणार आहेत.

काय आहे पंतप्रधान मोदींनी ठेवलेल्या मादी चित्त्याचं नाव?

या चित्त्यांना गेल्या आठवड्यात नामिबियातून कुनो नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्या दिवशी कुनोला पोहोचले होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी चार वर्षांच्या मादी चित्त्याचे नाव 'आशा' ठेवले.

या सर्व चित्त्यांपैकी सर्वात जुनी 8 वर्षांची मादी चित्ता आहे, तिचे नाव 'साशा' आहे. साशाच्या जवळच्या मैत्रिणीचे नाव 'सवानाह' आहे. आणखी एका मादी चित्त्याचे नाव 'सियाया' आहे. फ्रेडी, एल्टन आणि ओबान अशी तीन नर चित्त्यांची नावे आहेत. आणखी एक चित्ता अडीच वर्षांचा आहे, त्याचे नाव 'तबल्सी' आहे.

माध्यमांच्या वृत्तानुसार, नामिबियातून कुनो नॅशनल पार्कमध्ये आणलेले चित्ते इथल्या वातावरणात मिसळण्याचा प्रयत्न करत आहेत. नामिबियातील 6 तज्ञ आणि कुनो वनविभागातील 4 डॉक्टर सतत चित्त्यांवर लक्ष ठेवून आहेत.

शनिवार, 17 सप्टेंबरपासून ते मंगळवार, 21 सप्टेंबरच्या रात्रीपर्यंत 25 हून अधिक वेळा चित्ताचे दर्शन झाले आहे. कुनो नॅशनल पार्कच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, चित्त्यांना कंपार्टमेंटमध्ये क्वारंटाईन करण्यात आले असल्याने कोणीही त्यांना भेट दिली नाही. त्याच्या हालचालींवर बाहेरून सतत नजर ठेवली जात आहे.