सूरत: महात्मा गांधींच्या गुजरातमध्ये दारुबंदीचा निर्णय लागू करण्यात येऊन कैक वर्षे झाली. पण, सत्तेत असलेल्या भाजप सरकारने अनेक पावले टाकूनही या राज्यातील दारुबंदीचा निर्णय फेल ठरला आहे. एका अहवालानुसार गुजरातमधील बहुतांश पुरूष हे नशेत टल्ली असतात. या टल्ली तळीरामांमुळे गुजरातमधील ६७ ट्क्के महिला या दारूपीडीत ठरल्या आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नुकत्याच प्रसारीत झालेल्या अहवालात धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. अहवालात म्हटले आहे की, दारूबंदी फेल ठरल्यामुळे १९ टक्के महिलांना कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करवा लागतो आहे. तर, ६७ टक्के महिला या दारूड्या नवऱ्यांमुळे पिडीत आहेत.
अहवालानुसार, गुजारतमध्ये राहणाऱ्या ७२ टक्के महिला या कोठेही वाच्यता न केल्यामुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी ठरतात. थेट आणि सोप्या शब्दांत सांगायचे तर, गुजरातमधील प्रत्येक पाचवी महिला ही दारूडा पती आणि कौटुंबिक हिंसाचाराची बळी ठरलेली असते. इटरनॅशनल इंस्टीट्यूट फॉर सायन्सने गुजरातमधील २६ जिल्ह्यांमधील सुमारे २० हजार ५२४ घरांतील २२, ९९२ महिला आणि ५५७४ पुरुषांसोबत संवाद साधून हा अहवाल तयार केला.
अहवालात असेही म्हटले आहे की, गुजारतमधील २१ टक्के महिला पतीला घाबरून भीतीच्या छायेत जगत असतात. २३.१ टक्के महिला पतीच्या मानसिक, शारीरिक आणि लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरतात. यात २०टक्के शारीरिक छळ, ४ टक्के महिला या लैंगिक तर, ११.८ टक्के महिला मानसिक छळाच्या शिकार आहेत. सर्व्हेदरम्यान ४६ टक्के महिलांनी कबूल केले की त्यांचे पती त्यांच्यावर अत्याचर करतात.