व्हिडिओ : ११० फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेली चिमुरडी सुखरूप बाहेर

गर्दीला ताब्यात ठेवण्यासाठी पोलीस दल तैनात करावं लागलं

Updated: Aug 2, 2018, 08:26 AM IST
व्हिडिओ : ११० फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेली चिमुरडी सुखरूप बाहेर title=

पाटणा : बिहारच्या मुंगेरमध्ये मंगळवारी दुपारी ११० फूट खोल बोअरवेलच्या खड्ड्यात अवघ्या तीन वर्षांची एक चिमुरडी कोसळली होती. तब्बल ३१ तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर बुधवारी सायंकाळी या चिमुरडीला सुखरूप बाहेर काढण्यात सुरक्षा यंत्रणेला यश मिळालंय. या मुलीला प्राथमिक उपचारासांठी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय. चिमुरडी धोक्यातून बाहेर असल्याचा निर्वाळा डॉक्टरांनी दिला. 

मुंगेर जिल्ह्याच्या कोतवाली भागात मुर्गीयाचक मोहल्ल्यात मंगळवारी ती वर्षांची एक मुलगी खेळता खेळता घरासमोरच खोदलेल्या बोअरवेलच्या खड्ड्यात पडली होती. मुर्गियाचकचे रहिवासी उमेश नंदन प्रसाद साव यांच्या घरासाठी ही बोअरिंग खोदण्यात आली होती. खेळता खेळता त्यांचीच तीन वर्षांची नात सन्नो या खड्ड्यात पडली. 

हे कुटुंबीयांना समजल्यानंतर कुटुंबीयांनी आक्रोश सुरू केला... आणि सगळेच मुलीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले... यात त्यांना यश येण्याची काही चिन्हं दिसेनात त्यामुळे त्यांनी पोलिसांना संपर्क साधला. 

पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन अग्मिशमन दलासोबत मुलीला वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यानंतर एनडीआरएफ आणि एसडीआरएफलाही या घटनेबद्दल सूचित करण्यात आलं. मंगळवारी रात्र एनडीआरएफच्या टीमनं रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. 

एनडीआरएफनं पाईपनं मुलीला ऑक्सीजन देणं सुरू केलं... आणि बोअरवेलसोबत एका मोठ्या खड्ड्याचं खोदकाम सुरू केलं. एनडीआरएफनं हाय फ्रिक्वेन्सी माईकच्या साहाय्यानं मुलीशी संपर्क केला... आणि आई-वडिलांशी बोलण्यात तिला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला. 

घटनेची बातमी परिसरात समजताच लोकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली... या गर्दीला ताब्यात ठेवण्यासाठी पोलीस दल तैनात करावं लागलं. त्यानंतर अथक प्रयत्नांनंतर बुधवारी सायंकाळी मुलीला बोअरवेलमधून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं.