नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाच्या अवमान प्रकरणाशी निगडीत अनिल अंबानी यांना चुकीच्या पद्धतीनं साथ दिल्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं कोर्टाच्या दोन असिस्टंट रजिस्ट्रारला नोकरीतून काढून टाकण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे, अनिल अंबानींना साथ देण्यासाठी कोर्ट स्टाफही 'मॅनेज' झाला होता, हे आता स्पष्ट झालंय. सर्वोच्च न्यायालयानं अनिल अंबानी यांना कोर्टासमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतु, दोषी दोन अधिकाऱ्यांनी मात्र कोर्टाची ऑर्डरशीट टाईप करताना अधिकार नसतानाही अंबानी यांना सुप्रीम कोर्टात हजर राहण्यातून सूट देऊन टाकली होती.
सर्वोच्च न्यायालयानं १० जानेवारी रोजी दिलेल्या आपल्या आदेशात अंबानी यांना १२ फेब्रुवारी रोजी न्यायालयासमोर हजर होण्याचे आदेश दिले होते. परंतु, न्यायालयाचा हा आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर पब्लिक डोमेनमध्ये दिसला तेव्हा त्यात अंबानी यांना हजर राहण्याचे आदेश मात्र हटवण्यात आले होते.
ही गोष्ट लक्षात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर या दोन असिस्टंट रजिस्ट्रारला लगेचच नोकरीतून काढून टाकण्यात आलं. मानव शर्मा आणि तपन कुमार चक्रवर्ती अशी या दोघांची नावं आहेत. या दोघांवर सर्वोच्च न्यायालयानं संविधानाच्या कलम ३११ नुसार कारवाई केलीय. न्यायालयानं आणि न्यायाधीशांच्या खंडपीठानं दिलेले सर्व आदेश लिखित स्वरुपात पुरवण्याचं काम या असिस्टंट रजिस्ट्रारकडे सोपवलेलं असतं.
एरिक्सन कंपनीला ५५० कोटी रुपये न चुकविता आल्यानं रिलायन्स कम्युनिकेशनचे संचालक अनिल अंबानी यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी एरिक्सन इंडियाच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी पूर्ण झाली. या प्रकरणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालय नंतर सुनावणार आहे.