Assembly Elections 2018 : कमल, रजनी उवाच.....भाजपाचा प्रभाव संपुष्टात

सत्ताधारी पक्षांकडे मतदारांची पाठ... 

Updated: Dec 12, 2018, 08:00 AM IST
Assembly Elections 2018 : कमल, रजनी उवाच.....भाजपाचा प्रभाव संपुष्टात title=

मुंबई  :  देशाच्या राजकारणात सत्ताधारी भाजपाला पाच राज्यांमध्ये घेण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये चांगलाच फटका बसल्याचं पाहायला मिळालं. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगाणा आणि मिझोराम अशा पाच राज्यांमध्ये घेण्यात आलेल्या निवडणूकांचा निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आणि सत्ताधारी पक्षांकडे मतदारांनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं. हीच एकंदर परिस्थिती, काँग्रेसच्या वाट्याला आलेलं यश पाहता अनेकांनीच याविषयी प्रतिक्रिया दिल्या. 

कलाविश्वाकडून राजकारणाकडे वळलेल्या सुपरस्टार अभिनेते रजनीकांत आणि अभिनेते कमल हसन यांनीही विधानसभा निवडणूकांच्या निकालानंतर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान येथे भाजपाच्या प्रतिष्ठेला लागलेली ठेच पाहता, या पक्षाचा प्रभाव आता संपुष्टात आल्याची प्रतिक्रिया 'थलैवा'ने दिली. 

स्थानिक विमानतळावर रजनीकांत यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपलं मत मांडलं. 'निवडणुकांचे एकंदर निकाल पाहता भाजपाचा प्रभाव संपुष्टात आल्याचं स्पष्ट होत आहे. अतिशय अतितटीच्या या निकालांमध्ये भागपासाठी हा एक प्रकारचा मोठा धक्काच आहे, यात कोणताही वाद नाही', असं ते म्हणाले. 

एकिकडे 'थलैवा'ने विधानसभा निवडणुकांवर आपली प्रतिक्रिया दिली असतानाच दुसरीकडे कमल हसन यांनीही सर्वांचं लक्ष वेधलं. 'मक्कल निधी मैय्यम'चे प्रमुख अभिनेते कमल हसन यांनीही तामिळ भाषे ट्विट करत निवडणूकीच्या निकालांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

'हे एका शुभारंभाचे संकेत आहेत. हा जनतेचाच आदेश आहे', असं म्हणत त्यांनी ट्विट केलं. अभिनयातून राजकीय विश्वाकडे वळलेल्या या दोन्ही अभिनेत्यांच्या प्रतिक्रिया पाहता आता त्यांच्याही पक्षांची पुढची रणनिती काय असणार याविषयी तर्क लावण्यास सुरुवात झाली आहे.