17.5 कोटींच्या इंजेक्शनमुळे वाचलं 18 महिन्यांचं बाळ; थेट CM ने घरी जाऊन घेतली भेट

18 Month Old Boy Rare Genetic Disease: मागील बऱ्याच काळापासून या चिमुकल्याच्या इलाजासाठी पैसे गोळा करण्याची मोहीम सुरु होती. या मोहिमेचं नेतृत्व एका खासदाराने केलं विशेष.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 12, 2023, 08:23 PM IST
17.5 कोटींच्या इंजेक्शनमुळे वाचलं 18 महिन्यांचं बाळ; थेट CM ने घरी जाऊन घेतली भेट title=
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी आज या मुलाची आणि त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली

18 Month Old Boy Rare Genetic Disease:  दुर्मिळ आणि अनुवांशिक आजारामुळे पीडित असलेल्या नजफगढ येथील कनव नावाच्या चिमुकल्याला जीवनदान मिळालं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज कनव आणि त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली. या 18 महिन्यांच्या चिमुकल्यावर उपचार करण्यासाठी मंगळवारी नवी दिल्लीमधून इंजेक्शन मागवण्यात आलं. या इंजेक्शनची किंमत 17.5 कोटी रुपये इतकी आहे. या इंजेक्शनसाठी लोकांकडून पैसे गोळा करण्यात आले आहेत. हे पैसे गोळा करण्यासाठी आम आदमी पार्टीचे खासदार संजीव अरोडा यांनी पुढाकार घेतला होता.

खासदाराच्या नेतृत्वाखाली जमा केला निधी

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कनवला जन्मापासून अनुवंशिक आजार होता अशी माहिती दिली. अशाप्रकारचा आजार असलेली केवळ 9 बालकं देशात आहेत. तपासणीनंतर अमेरिकेतून विशेष इंजेक्शन मागवण्यात आलं तर या आजारावर इलाज करणं शक्य आहे अशी माहिती समोर आल्यानंतर हलचाली सुरु झाल्याचं केजरीवाल म्हणाले. मात्र इंजेक्शनची किंमत ऐकून कुटुंबाला एवढं महागडा इलाज परवडणार नाही असं वाटल्याने त्यांना काय करावं सुचत नव्हतं. अशातच त्यांनी आम आदमी पार्टीचे खासदार संजीव अरोडा यांच्याशी संपर्क साधून आपली व्यथा सांगितली.

कंपनीनेही दिली कोट्यवधींची सूट

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार अरोडा यांनी लोकांच्या माध्यमातून म्हणजेच क्राउडफंडिंगच्या माध्यमातून पैसे गोळा करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये आपचे नेते, सर्वसामान्य जनता आणि काही सेलिब्रिटींनीही आर्थिक मदत केली. या माध्यमातून 10.5 कोटी रुपये जमा झाले. पुढील 6.5 कोटी कमवण्याचं आव्हान समोर असतानाच अमेरिकेमधील या इंजेक्शन बनवणाऱ्या कंपनीला संपर्क साधून माहिती देण्यात आली. या कंपनीनेही सामाजिक भान जपत इंजेक्शन 10.5 कोटींना देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर हे इंजेक्शन विकत घेऊन भारतात आणण्यात आलं आणि या चिमुकल्याला देण्यात आलं. 

सर्वांचे मानले आभार

अरविंद केजरीवाल यांनी या मुलाला इंजेक्शन देण्यात आल्यानंतर या मोहिमेसाठी मदत करणाऱ्या प्रत्येकाचे अभार मानले आहेत. मी त्या सर्व लोकांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी पैसे दान केले. यामध्ये काही प्रसिद्ध व्यक्तींचाही समावेश आहे. तसेच काही खासदारांचाही समावेश आहे. अमेरिकेतील औषध निर्मिती कंपनीने सूट देत हे औषध विकण्याचा निर्णय घेतल्याबद्दल केजरीवाल यांनी या कंपनीचेही आभार मानले.