विषारी मशरुम खाल्ल्याने 16 जणांचा मृत्यू; भारतातील 'या' राज्यात दरवर्षी दगावतात लोक कारण...

Die Due To Mushroom Poisoning: मागील अनेक महिन्यांपासून या राज्यामध्ये मथरुमचं सेवन केल्याने विषबाधा होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या घटना खास करुन एप्रिल आणि मे महिन्यामध्येच घडतात. अशा घटनांमध्ये मागील दीड वर्षांमध्ये 16 जणांनी प्राण गमावले आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 25, 2023, 04:08 PM IST
विषारी मशरुम खाल्ल्याने 16 जणांचा मृत्यू; भारतातील 'या' राज्यात दरवर्षी दगावतात लोक कारण... title=
अनेक जिल्ह्यांमध्ये अशी प्रकरण समोर आली आहेत

16 Die Due To Mushroom Poisoning: आसाममधील धेमाजी जिल्ह्यामध्ये विषारी जंगली मशरुम खाल्ल्याने 16 जणांना विषबाधा झाली आहे. यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश असून रात्रीच्या जेवणाच्या वेळी ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी रात्री जिल्ह्यात घडलेल्या 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये विषारी मथरुम खाऊन 16 जण आजारी पडले. पहिली घटना मिसामारा गावात घडली. या ठिकाणी एकूण 11 जण विषारी मशरुम खाल्ल्याने आजारी पडले तर अन्य एका घटनेत 5 जणांना मशरुममुळेच विषबाधा झाली. दुसरी घटना शिलपथरा गावात घडली असून एकाच कुटुंबातील 5 लोकांना विषबाधा झाली. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी या सर्व लोकांनी 20 जूनच्या रात्री विषारी मशरुम असलेली रस्सा भाजी खाल्ली होती अशी माहिती दिली आहे. या सर्वांना उलट्या, मळमळणे, जुलाब, पोटदुखी सारखा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

एकाच कुटुंबातील 8 जणांना विषबाधा

मागील महिन्यामध्येही आसाममधीलच शिवसागर जिल्ह्यामधील एकाच कुटुंबातील 8 जण विषारी मशरुम खाल्ल्याने आजारी पडले होते. याच वर्षी एप्रिल महिन्यामध्ये 3 जणांचा विषारी मशरुम खाल्ल्याने मृत्यू झाला होता. ही घटना राज्यातील गोलाघाट जिल्ह्यात घडलेली. मरण पावलेल्यांमध्ये एका 2 वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश होता. 5 कुटुंबांमधील 15 सदस्यांनी 2 एप्रिलच्या रात्री विषारी मशरुम असलेला रस्सा खाल्ला होता. 

13 जणांचा मृत्यू

मागील वर्षी एप्रिल महिन्यामध्ये चरैदेव, दिब्रुगड, शिवसागर आणि तिनसुकिया या जिल्ह्यांमधील 35 जणांना विषारी मशरुमची बाधा झाल्याने त्यांना आसाम मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. यापैकी तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला होता. आसाममध्ये अशाप्रकारे मशरुममुळे विषबाधा झाल्याची प्रकरणं सामान्य मानली जातात. 

या विषबाधेचं कारण काय?

विशेष म्हणजे ज्या कुटुंबांमध्ये विषबाधेचे हे प्रकार घडले आहेत ते सर्वजण चहाच्या मळ्यांमधील गरीब कामगार आहे. सामान्यपणे हे प्रकार मार्च आणि एप्रिलच्या महिन्यात होतात. कारण याच कालावधीमध्ये चहाच्या मळ्यांमध्ये शेकडोंच्या संख्येनं जंगली मथरुम उगवतात. चहाच्या मळ्यात काम करणारे अनेक कामगार हे आदिवासी समाजातील असल्याने त्यांच्यापैकी अनेकजण हे दारिद्र्यरेषेखालील आहेत. मागील अनेक वर्षांपासून ते मानधान वाढवून देण्याची मागणी करत आहेत. मात्र 2021 मध्ये केवळ ब्रम्हपुत्रा नदीच्या पात्रातील चहाच्या मळ्यांमधील कामगारांचं मानधन वाढवून 205 रुपये करण्यात आलं. या कामगारांनी मानधन 351 रुपये इतकं द्यावं अशी मागणी केली होती. भाज्या उपलब्ध नसण्याबरोबरच आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने या लोकांना भाज्या विकत घेणं शक्य नसतं. त्यामुळेच जंगली मशरुमसारख्या भाज्यांवर या लोकांना अवलंबून राहवं लागतं असं स्थानिक डॉक्टर सांगतात.