Madhya Pradesh Khargone Bus Accident : मध्य प्रदेशात खरगोनमध्ये बसला मोठा अपघात झाला. भरधाव जाणाऱ्या बसने पुलाचा संरक्षक कठडा तोडला. त्यानंतर पुलावरुन बस कोसळून 15 जण ठार तर 25 जखमी झालेत. मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, मध्य प्रदेश सरकारने मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना आर्थिक मदत जाहीर केली आहे.
मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये बसने पुलाचा कठडा तोडला. त्यानंतर ही बस नदीच्या पात्रात कोसळली. यावेळी बसमधील प्रवाशांनी मोठा आरडाओरडा केला. या बस अपघातात 50 हून अधिक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त होत होती. मात्र, या अपघातात 15 ठार आणि 25 जण जखमी झालेत. खरगोनहून ही बस इंदूरला जात होती. बस पुलावर आली असता संरक्षक कठडा तोडून बस खाली कोसळली.
Madhya Pradesh | 15 people dead and 25 injured after a bus falls from a bridge in Khargone. Rescue operation underway: Dharam Veer Singh, SP Khargone pic.twitter.com/X66l8Vt7iT
— ANI (@ANI) May 9, 2023
खरगोन बस अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये आणि गंभीर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये आणि किरकोळ जखमींना प्रत्येकी 25,000 रुपये तत्काळ आर्थिक मदत राज्य सरकारने जाहीर केली. दरम्यान, मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल यांनी खरगोन येथे झालेल्या भीषण बस अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट केले आहे. खरगोन जिल्ह्यातील डोंगरगाव आणि दानसागा दरम्यान बस अपघाताची बातमी दुःखद आहे. मृतांच्या आत्म्याला शांती मिळो, शोकाकुल कुटुंबीयांना हे मोठे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो. आणि जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
महाराष्ट्रात झालेल्या रस्ता अपघातात सात जण गंभीर जखमी झाले आहेत. रायगड जिल्ह्यात मुंबई - गोवा या राष्ट्रीय महामार्गावर हा भीषण अपघात झाला. कोळसा वाहतूक करणाऱ्या डंपरची एसटी बसला जोरदार धडक बसली. बसमधील सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर महाडच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महाड जवळ नातेखिंड येथे हा अपघात झाला आहे. मुंबईहून महाबळेश्वर येथे जाणाऱ्या बसला डंपरची इतकी भीषण धडक बसली की बसच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. यावेळी बसमधील अनेक प्रवासी एकमेकांवर आदळलेत.