Tamil Nadu News : तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तामिळनाडूच्या वेल्लोरमध्ये भारतीय लष्करातील (Indian Army) एका जवानाच्या पत्नीला बेदम मारहाण करण्यात आली आहे. पत्नीच्या अंगावरील कपडे काढून तिला ओढूत 120 जणांनी मिळून तिला मारहाण केल्याचा आरोप जम्मू काश्मिरमध्ये तैनात असलेल्या जवानाने केला आहे. महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिलेच्या पतीने व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. जवानाने तामिळनाडू सरकारकडे याबाबत मदत देखील मागितली आहे. मात्र पोलिसांनी (Tamil Nadu Police) जवानाच्या दाव्यामध्ये तथ्य नसल्याचे म्हटलं आहे.
पत्नीला स्थानिक गुंडांनी बेदम मारहाण केल्याची माहिती लष्करी जवानाने जम्मूतून दिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या महिलेला जीएच वेल्लोर अदुक्कमपराई येथे दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. निवृत्त लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल एन थियागराजन यांनी हा व्हिडीओ ट्विटरव पोस्ट केला आहे. व्हिडिओतील जवान हा तामिळनाडूच्या पडवेडू गावचा असून सध्या तो काश्मीरमध्ये तैनात आहे.
काय म्हटलंय व्हिडीओमध्ये?
"मी देशाला शत्रूंपासून वाचवण्यासाठी भारतीय सैन्यात आहे आणि सध्या काश्मीरमध्ये तैनात आहे. मी माझ्या घरापासून शेकडो किलोमीटर दूर आहे. माझी पत्नी भाडेतत्त्वावर एक दुकान चालवते. तिला 120 लोकांनी मारहाण केली आणि दुकानातील सामान बाहेर फेकले. मी पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली असून त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे. कृपया मदत करा. त्यांनी माझ्या कुटुंबावर चाकूने हल्ला करून धमकावले आहे. माझ्या पत्नीला अर्धनग्न करून अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे," असे जवानाने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. व्हिडिओमध्ये तो हात जोडून गुडघ्यावर बसून न्याय मागताना दिसत आहे.
पोलिसांनी फेटाळून लावले आरोप
दुसरीकडे, कंधवसल पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर या संदर्भात एक निवेदन जारी केले असून ही घटना अतिशयोक्तीपूर्ण असल्याचा दावा केला आहे. पोलिसांनी सांगितले की, रेणुगंबल मंदिराच्या मालकीच्या जमिनीवर बांधलेले एक दुकान जवानाच्या सासऱ्यांना एका व्यक्तीने पाच वर्षांच्या कालावधीसाठी 9.5 लाख रुपयांना भाड्याने दिले होते. ती व्यक्ती मरण पावल्यानंतर त्यांच्या मुलाला हे दुकान परत हवे होते. त्यामुळे त्याने पैसे परत देण्याचे ठरवले. मात्र जवानाच्या सासऱ्याने पैसे घेण्यास आणि दुकान सोडण्यास नकार दिला.
10 जून रोजी, मूळ मालकाचा मुलगा पैसे देण्यासाठी दुकानात गेला होता. त्यावेळी जवानाच्या मेव्हण्यांनी त्या मुलावर चाकूने डोक्यात हल्ला केला. त्यानंतर लोकांनी त्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि यानंतर जोरदार हाणामारी झाली. त्यावेळी वस्तू दुकानाबाहेर फेकण्यात आल्या. पोलिसांनी दावा केला की जवानाची पत्नी आणि आई दुकानात असताना जमावाने त्यांच्यावर हल्ला केला नाही. मात्र संध्याकाळी जवानाच्या पत्नीने स्वतःला रुग्णालयात दाखल केले. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्याच्या पत्नीला गंभीर दुखापत झाल्याचे जवान म्हणत असला तरी ते खरे नाही.
दरम्यान, कंधवसल पोलिसांनी तक्रारींच्या आधारे दोन्ही बाजूच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि सविस्तर तपास सुरू केला आहे. पण जवानाचे आरोप चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले.