पश्चिम बंगालमध्ये 12 वर्षाच्या चिमुरड्याने एक मोठी ट्रेन दुर्घटना टळली. रुळ तुटलेला असताना ट्रेन वेगाने त्याच्या दिशेने येत होती. यावेळी मुलाने दुर्घटना टाळण्याच्या हेतूने लाल शर्ट हवेत फडकवण्यास सुरुवात केली. लोको-पायलटने लाल कापड पाहताच आपातकालीन ब्रेक दाबला आणि एक मोठी दुर्घटना टळली. यानंतर मुलाच्या शौर्याचं कौतुक केलं जात आहे. रेल्वेने मुलाला बक्षीसही दिलं आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात 12 वर्षाच्या मुलाला रेल्वे रुळाचं नुकसान झालं असल्याचं पाहिलं. यादरम्यान एक प्रवासी ट्रेन या रुळावरुन जाणार होती. ट्रेन वेगाने या रुळाच्या दिशेने येत होती. एक मोठी दुर्घटना होण्याची शक्यता लक्षात घेता मुलाने प्रसंगावधान दाखवलं. मुलाने लाल शर्ट हवेत फडकावत लोको पायलटला ट्रेन थांबवण्यास सांगितलं. लोको पायलटलाही पुढे धोका असल्याचं लक्षात आलं आणि इमर्जन्सी ब्रेक दाबले. मुरसलीन शेख असं या मुलाचं नाव आहे. गुरुवारी भालुका रोड यार्डाजवळ ही घटना घडली.
नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सब्यसाची डे यांनी सांगितलं आहे की, "मालदा येथे 12 वर्षाच्या मुलाने ट्रेन रोखण्यासाठी लाल शर्ट हवेत फडकावला. यामुळे लोको पायलटने इमर्जन्सी ब्रेक लावून प्रवासी रेल्वे रोखली. पावसामुळे रेल्वे ट्रॅकचं नुकसान झालं असल्याने मुलाने रेल्वे थांबवली".
पावसामुळे माती आणि दगड वाहून ट्रॅकवर आले होते. मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "जवळच्या गावात एक प्रवासी मजुराचा मुलगा मुरसलीन शेख रेल्वे कर्मचाऱ्यांसह यार्डमध्ये उपस्थित होता. रुळाच्या खालील भाग वाहून गेल्याचं पाहिल्यानंतर त्याने प्रसंगावधान दाखवलं. त्याने समोरुन येणाऱ्या ट्रेनच्या लोको पायलटला इतर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने लाल शर्ट दाखवलं".
दरम्यान नुकसानग्रस्त रुळाचं काम करण्यात आलं आहे. दरम्यान प्रसंगावधान दाखवणाऱ्या या मुलाला त्याच्या शौर्यासाठी प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देत पुरस्कृत केलं जाणार आहे.