मुंबई : कोरोनाने थैमान घातलं असता अजून एका व्हायरसने देशात शिरकाव केला आहे. केरळमध्ये झिका व्हायरसच्या पहिल्या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. तिरुअनंतपुरममध्ये राहणाऱ्या 24 वर्षीय गर्भवती महिलेला हा संसर्ग झाल्याची माहिती आहे. पुण्यातील राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्थेला पाठवलेल्या नमुन्यांची तपासणी केल्यावर झिका संसर्ग नमुन्यांमध्ये आढळून आला आहे. हे सर्व नमुने तिरुअनंतपुरमहून पाठवण्यात आले होते. सध्या संक्रमित महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रुग्णालयातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हा विषाणू घातक नाही. यामुळे काळजी करण्याची गोष्ट नाही. डोकेदुखी, ताप आणि शरीरावर डाग दिसून आल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. महिलेचा नमुना तपासणीसाठी पुण्यात पाठवण्यात आला, त्यानंतर या महिलेला झिका विषाणूची लागण झाल्याचे दिसून आले.
झिका व्हायरसची लक्षणं चिकनगुनिया आणि डेंग्यू सारखीच आहेत. सामान्यत: एखाद्याला डास चावल्यानंतर 2-7 दिवसांच्या कालावधीत झिका विषाणूची लागण होते. सौम्य ताप, डोकेदुखी, स्नायू आणि सांधेदुखी, मळमळ, उलट्या अशी लक्षणं संक्रमित रूग्णात दिसतात.
आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते, जर संक्रमित व्यक्तीने पुरेशी विश्रांती घेतली तर हे संसर्ग नियंत्रित केलं जाऊ शकते. झिका व्हायरससाठी सध्या कोणतीही अँटी-फंगल औषध किंवा लस उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत, दिवसा डास चावण्यापासून बचाव करण्याचा उत्तम उपाय आहे.