मुंबई : सहा महिन्यापूर्वी वर्गातील काही मुलांनी सायलीला अपशब्द वापरला. तेव्हापासून ती बिथरली होती. तिला शाळेत जाण्याची इच्छाच नव्हती. पण तिला नैराश्य आलंय हे तिचे पालक मान्य करतच नव्हते.
सायलीच्या शाळेतील शिक्षकांनी तिच्या घरच्यांना नैराश्य म्हणजे काय हे समजावून सांगितलं. तेव्हा कुठे तिच्या पालकांचे डोळे उघडले आणि त्यांनी तिला मनोविकार तज्ञांकडे नेलं. त्यांच्या उपचारांनी ती बरी झाली.. पण, मुलांमध्ये असं नैराश्य का येतं आणि त्याची लक्षणे कोणती हे जाणून घेऊ.
नैराश्य असलेली मुले स्वतःहून काही बोलत नाहीत, सांगत नाहीत. त्यामुळे नैराश्य ओळखणं तसं खूप कठीण जातं. पण, पालकांनी त्यांच्या वागण्याचा व्यवस्थित अभ्यास केल्यास नैराश्य ओळखता येऊ शकते.
वागण्यात अचानक होणारा बदल, चिडचिडेपणा, हट्टीपणा, निराश व चिंताग्रस्त राहणारी किंवा घाबरलेली, गोंधळलेली मुले, एकलकोंडी किंवा आक्रमक असणाऱ्या मुलांमध्ये नैराश्य असू शकते हे समजून घ्यायला हवे.
झोप न लागणे किंवा अति झोप लागणे, भूक किंवा वजन कमी होणे किंवा वाढणे, अभ्यासात लक्ष न लागणे, अभ्यासात किंवा मार्कामध्ये घसरण होणे, खेळ किंवा इतर आवडत्या गोष्टी बंद करणे किंवा कमी करणे, एकांतात राहणे किंवा रडणे यापैकी काही लक्षणे दिसणे.
मानसिक आजारांमधील सर्वात जास्त आढळणारा हा त्रास आहे. हा त्रास वारंवार उद्भवणारा असू शकतो. उपचाराअंती पूर्ण बरं वाटतं पण पुन्हा काही महिन्यानंतर किंवा वर्षानंतर हा त्रास उद्भवू शकतो.
नैराश्य येण्याची प्रत्येकाची कारण वेगवेगळी असतात. पण त्यावर उपचार आहेत. उपचाराअंती हा रूग्ण पूर्ण बरा होऊ शकतो. पण यासाठी आवश्यक त्या तपासण्या होणं आवश्यक आहे.
या काळात आत्महत्येचे विचार खूप प्रबळ असतात किंवा तसा प्रयत्न केला असेल तर ECT (Electro Convulsive Therapy) आवश्यक ठरते. सोबतच रूग्णाला मानसिक आधाराची गरज असते. त्यासाठी समुपदेशन, विचारपद्धतीत बदल घडवून आणण्यासाठी Cognitive Behaviour Therapy REBT या Psychotherapy ची आवश्यकता असते.