World Tuberculosis Day 2023: जागतिक क्षयरोग दिन 24 मार्चलाच का साजरा केला जातो? यंदाची World TB Day ची थीम काय?

World Tuberculosis Day 2023: दरवर्षी 24 मार्च रोजी "जागतिक क्षयरोग दिन" हा साजरा केला जातो. पण हा दिवस याच तारखेला का साजरा होतो यामागे एक विशेष कारण आहे. तसेच यंदाच्या वर्षी या दिवसाची थीमही फार खास असून त्या थीमची अनेक उद्दीष्टे आहेत.

Updated: Mar 24, 2023, 11:38 AM IST
World Tuberculosis Day 2023: जागतिक क्षयरोग दिन 24 मार्चलाच का साजरा केला जातो? यंदाची World TB Day ची थीम काय? title=
World Tuberculosis Day 2023

World Tuberculosis Day 2023: दरवर्षी 24 मार्च हा दिवस जगभरामध्ये जागतिक क्षयरोग दिन म्हणजेच वर्ल्ड टीबी डे (World TB Day) म्हणून साजरा केला जातो. टीबी या आजाराबद्दल जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. मात्र हा दिवस 24 मार्च रोजीच का साजरा केला जातो? यंदाच्या वर्षीची या दिवसाची थीम काय आहे? टीबीचा नेमका अर्थ काय यासारखे प्रश्न तुम्हालाही पडले असती. या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात...

नाव 200 वर्षांपूर्वी पण अस्तित्वात आहे 3 दशलक्ष वर्षांपासून

क्षयरोग हा जगभरातील सर्वात संसर्गजन्य रोगांपैकी एक असून तो अत्यंत प्राणघातक आहे. विशेष म्हणजे या रोगाचा संसर्ग झाल्यास फक्त फुफ्फुसांवर परिणाम होतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या शिंकेमधून बाहेर पडलेल्या ड्रॉपलेट्समधील बॅक्टेरियांच्या माध्यमातून या रोगाचा प्रसार होतो. विशेष गोष्ट म्हणजे या आजाराला नाव जरी साधारण 200 वर्षांपूर्वीच देण्यात आलं असलं तरी तो फार पूर्वीपासूनच तो अस्तित्वात आहे. जोहान शॉनलेन यांनी 1834 साली 'क्षयरोग' (ट्युबरक्युलोसिस) हा शब्द प्रथम वापरला असला तरी अमेरिकेतील आरोग्य विषयक यंत्रणा असलेल्या सीडीसीच्या अंदाजानुसार हा आजार तब्बल 3 दशलक्ष वर्षांपासून अस्तित्वात आहे.

...म्हणून 24 मार्चलाच साजरा होतो हा दिवस

दरवर्षी 24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन साजरा होतो. या दिवशी जगभरातील लोक या आजाराविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न अधोरेखित करतात. जगभरात वारंवार डोकं वर काढणाऱ्या क्षयरोगाच्या महामारीचा सामना करण्यासाठी वेळोवेळी काय कारवाई केली जाते, तसेच केली जात नसेल तर ती करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. आता 24 मार्चलाच हा दिवस का साजरा केला जातो असा प्रश्न पडला असेल तर याच दिवशी मानवाला या आजारासाठी कारणीभूत असलेल्या विषाणूचा शोध लागला होता. डॉ. रॉबर्ट कोच यांनी 1882 मध्ये याच तारखेला म्हणजे 24 मार्च रोजी क्षयरोगास कारणीभूत ठरणाऱ्या जीवाणूंचा शोध लावला. हा आजार 3 दशलक्ष वर्षांपासून अस्तित्वात असल्याचं सांगितलं जातं. तसेच क्षयरोगाचे वेगवेगळे प्रकार असून संबंधित संसर्ग झालेला रुग्ण कुठे सापडतो त्यानुसार त्याला विविध नावं दिली जातात.

नक्की वाचा >> World TB Day: ही 7 लक्षणं दिसत असतील तर तुम्हाला TB झालाय असं समजावं

टीबीचा संदर्भ काय?

टीबी हा शब्द टप्प्याटप्प्याने वाढत जाणारा आजार या अर्थाने मूळ स्वरुपात वापरला जायचा. पुरातन रोमन कालावधीमध्ये टॅब्स असा शब्द अशा आजारांसाठी वापरला जायचा. मान आणि लिम्फ नोड्सच्या टीबीसाठी मध्ययुगीन कालावधीमध्ये 'स्क्रोफुला' हा शब्द वापरला जायचा. स्क्रोफुला हा पूर्णपणे वेगळा आजार असून त्याचा परिणाम फुफ्फुसांवर होतो.

यंदाची थीम काय आणि त्याचा नेमका अर्थ काय?

"Yes! We can end TB!" म्हणजेच "होय! आपण टीबी संपवू शकतो!" अशी यंदाच्या वर्ल्ड टीबी डेची म्हणजेच World Tuberculosis Day 2023 ची थीम आहे. याच थीमच्या आधारावर जगभरातील नेत्यांना टीबीची साथ रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या थीमच्या माध्यमातून या आजारसंदर्भातील उपाययोजनांसाठी अधिक निधी देणे, तातडीने यावर उपाययजोना करणे, वेगवेगळ्या क्षेत्रांना एकत्र घेत या समस्येवर उपाय शोधणे, जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या निर्देशांची तातडीने अंमलबजावणी करणे, या आजारसंदर्भात जनगजागृती करण्यासारख्या उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न आहे.