का काढली जाते महिलांची गर्भपिशवी? डॉक्टरांनी सांगितली 'ही' कारणं!

नेमकं कोणत्या कारणामुळे महिलांना गर्भपिशवी काढावी लागते?

Updated: Aug 12, 2021, 11:55 AM IST
का काढली जाते महिलांची गर्भपिशवी? डॉक्टरांनी सांगितली 'ही' कारणं! title=

सुरभि जगदीश, झी मीडिया, मुंबई : मराठवाड्यात कोरोना काळात ऊसतोड महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली. गर्भपिशवीला सूज आलीये असं सांगून डॉक्टरांनी गर्भपिशवी काढण्याचा सल्ला दिल्याचं समजतंय. बीड जिल्ह्यात शेकडो महिलांच्या बाबतीत असा प्रकार घडला आहे. मात्र नेमकं कोणत्या कारणामुळे महिलांना गर्भपिशवी काढावी लागते? जाणून घेऊया...

स्त्रिच्या शरीरात उपस्थित गर्भाशय हा एक महत्त्वाचा अवयव आहे जिथे गर्भ विकसित होतो. गर्भाशय काढण्याच्या या प्रक्रियेला वैद्यकीय भाषेत 'हिस्टरेक्टॉमी' असं म्हणतात. हिस्टेरेक्टॉमी ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये गर्भाशयात कोणत्याही प्रकारच्या समस्या आल्यानंतर गर्भाशय कापून करून शरीराबाहेर काढलं जातं. या शस्त्रक्रियेनंतर स्त्रीला मासिक पाळी येत नाही किंवा ती आई होऊ शकत नाही.

यासंदर्भात झी 24 तासशी बोलताना मुंबईतील स्त्रिरोगतज्ज्ञ डॉ. कोमल चव्हाण म्हणाल्या, "जर गर्भाशयासंदर्भात महिलांना काही समस्या जाणवत असतील तर गर्भाशय काढून टाकलं जातं. मासिक पाळीची तक्रार, अतिरीक्त रक्तस्राव, कॅन्सरचा धोका, फायब्रॉईची मोठी गाठ अशा काही समस्यांमुळे महिलांना गर्भाशय काढून टाकण्याचा सल्ला देण्यात येतो."

डॉ. कोमल पुढे म्हणाल्या, "अधिकतर वय जास्त असलेल्या महिलांवर ही शस्त्रक्रिया होते. मात्र त्यापूर्वी सर्व प्रकारचे उपचार केले जातात. जर त्या उपचारांनी गर्भाशय वाचवण्यास यश आलं नाही तरच शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात येतो. तर तरूण मुलींमध्ये फार क्वचित प्रमाणात ही शस्त्रक्रिया केली जाते."

डॉ. कोमल यांच्या सांगण्यानुसार या कारणांमुळे गर्भाशय काढून टाकावं लागतं-

  • मासिक पाळीसंदर्भात समस्या
  • अधिक रस्तस्राव होणं
  • गर्भपिशवी खाली येत असल्यास
  • मोठ्या फायब्रॉईड्सच्या गाठी
  • गर्भाशयाला सूज येणं
  • गर्भाशयाच्या मुखाला पूर्व प्राथमिक कॅन्सर आढळून येणं
  • ओवेरीयन ट्यूमर

मुख्य म्हणजे या सर्व कारणांना तातडीने गर्भाशय काढण्याची आवश्यकता नसते. यावेळी महिलेचं वय, अपत्यांची संख्या, आणि त्रासाची गंभीरता पाहून निर्णय घेण्यात येतो.

हिस्टरेक्टॉमी ही एक मोठी शस्त्रक्रिया आहे. जर लहान वयातच गर्भाशय काढून टाकलं तर त्याचे दुष्परिणाम शरीरावरही दिसतात. हे दुष्परिणाम म्हणजे अकाली रजोनिवृत्ती, रक्त गोठण्याची समस्या, लघवी जाण्यात अडचण, ओटीपोटात दुखणं इत्यादी. दरम्यान काही प्रकरणांमध्ये गर्भाशयाच्या सभोवतालचे अवयवांना इजा होण्याचा धोका असतो.