मुंबई : सकाळी ऑफिस किंवा कॉलेजला जाण्याची घाई अनेकांना असते. अशावेळी काहीजणं सकाळचा ब्रेकफास्ट न करताच घराबाहेर पडतात. किंवा जे खाण्यासाठी मिळेल ते पटापट खाऊन कामाला जातात. सकाळी पोट उपाशी असल्याने आपण नेमकं काय खातोय याकडे लक्षं नसतं. मात्र असे अनेक पदार्थ आहेत जे सकाळी उपाशी पोटी खाऊ नये असं म्हणतात. हे पदार्थ उपाशी पोटी खाल्ल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.
सकाळी उठल्याबरोबर अनेकांना केळं खाण्याची सवय असते. बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करण्यासाठी केळं फायदेशीर असतं. केळ्यामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम या दोघांचंही प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे उपाशी पोटी केळं खाल्ल्याने रक्तामधील मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचं असंतुलन होतं. म्हणून सकाळी उपाशी पोटी केळं खाऊ नये.
सकाळच्या पहिल्या कॉफीच्या सीपने भलेही तुम्ही ताजेतवाने होत असाल मात्र उपाशी पोटी कॉफी पिणं तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतं. पोटात काहीही नसताना कॉफीचं सेवन केल्यास अॅसिडिटी वाढू लागते. यामुळे दिवसभर हार्टबर्न आणि अपचनाची समस्याही उद्भवू शकते. त्यामुळे सकाळी उठून कॉफी पिण्याअगोदर काहीतरी खाणं फायदेशीर ठरेल.
दही हे प्रोटीन, व्हिटॅमीन आणि खनिजांचं पॉवरहाऊस मानलं जातं. अनेकांच्या घरात नियमित स्वरूपाने दह्याचं सेवन केलं जातं. घरी लावलेलं दही किंवा बाजारातून विकत आणलेलं दही उपाशी पोटी खाऊ नये. कारण यामध्ये लॅक्टिक अॅसिड असतं. जेव्हा दही रिकामी पोटी खाल्लं जातं लॅक्टिक अॅसिडमधील बॅक्टेरिया पोटातील अॅसिडमुळे लाभ देऊ शकत नाहीत. यासाठीच दह्याचं सेवन चपाती, फळं किंवा इतर पदार्थांसोबत करणं फायदेशीर मानलं जातं.
टोमॅटो आपल्या शरीराला लायकोपीन पुरवतो. लायकोपीम शरीरासाठी चांगलं असतं मात्र रिकाम्या पोटी ते खाण्याचा सल्ला देत नाहीत. यामध्ये टॅनिक अॅसिड असतं ज्याची गॅस्ट्रिक अॅसिडसोबत प्रतिक्रिया होते. ज्यामुळे पोटात जळजळ तसंच पोटदुखीची समस्याही उद्भवू शकते. त्यामुळे टोमॅटोचा जेवण किंवा सलाडमध्ये समावेश करावा.
कच्च्या हिरव्या भाज्या फायबरचा मोठा स्त्रोत मानल्या जातात. मात्र यांचं रिकाम्या पोटी सेवन केल्याने अपचन तसंच बद्धकोष्ठता सारख्या तक्रारी समोर येऊ शकतात.