मुंबई : जपानी वॉटर थेरपी ही जपानची एक प्रसिद्ध वैद्यकीय पद्धत आहे. जपानमध्ये या पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. यामध्ये पचनसंस्था शुद्ध करण्यासाठी त्याचप्रमाणे पोटाचं आरोग्य चांगला राखण्यासाठी सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी खोलीच्या तापमानाचं पाणी उपाशी पोटी प्यायचं असतं. यावेळी तुम्ही सामान्य तापमानाच्या पाण्याशिवाय, तुम्ही गरम पाणी देखील पिऊ शकता.
जपानी वॉटर थेरपीच्या तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, थंड पाणी सर्व प्रकारे हानिकारक आहे. कारण ते आपल्या अन्नातील चरबी आणि तेल आपल्या पचनसंस्थेमध्ये घट्ट करतात. यामुळे तुमची पचनक्रिया मंदावू शकते. परिणामी तुम्हाला अनेक आजार जडू शकतात.
जपानी वॉटर थेरपीमध्ये, तुम्हाला उठल्यावर आणि दात घासण्यापूर्वी रिकाम्या पोटी पाणी प्यावं लागतं. चार ते पाच ग्लास खोलीच्या तापमानाइतकं पाणी रिकाम्या पोटी प्या. मुख्य म्हणजे, हे पाणी सामान्य तापमानाचं किंवा काही प्रमाणात कोमट असावं. सकाळचा ब्रेकफास्ट खाण्यापूर्वी 45 मिनिटं हे करा.
जपानी वॉटर थेरेपीचे फायदे
वजन कमी करण्यासाठी जपानी वॉटर थेरपीचा वापर केला जाऊ शकतो. या थेरेपीच्या माध्यमातून तुम्ही मर्यादित प्रमाणात कॅलरी सेवन करता. या थेरेपीचा वापर करताना दररोज अनेक ग्लास पाणी प्यावं लागतं.
या थेरेपीमध्ये पाण्याचं सेवन होतं. पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठता, डोकेदुखी आणि किडनी स्टोनपासून बचाव होतो. अनेकजण तहान भागवण्यासाठी इतर द्रव वापरतात. मात्र अशा पेयांमध्ये मीठ आणि साखरेचं प्रमाण असतं. जे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात.