मुंबई : उन्हाळ्यात थंडगार कलिंगड खायला कोणाला आवडत नाही. 90% पाणी असलेलं हे लाल रंगाचं फळ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने कलिंगडाचं सेवन करणं खूप महत्त्वाचे आहे, अन्यथा त्याचे नकारात्मक परिणामही होऊ लागतात.
नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, कलिंगड फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यातील पोषक घटक कमी होतात आणि ते आपल्या आरोग्यासाठीही हानिकारक ठरू शकतं. नेमकं काय या अभ्यासात म्हटलं आहे जाणून घेऊया.
जर्नल ऑफ अॅग्रिकल्चरल अँड फूड केमिस्ट्रीमध्ये प्रकाशित झालेल्या USDA अहवालात असं म्हटलं की, खोलीच्या तपमानावर ठेवलेलं कलिंगड रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेल्या कलिंगडापेक्षा अधिक पोषक तत्त्वं देतं. ओक्लाहोमाच्या दक्षिण मध्य कृषी संशोधन प्रयोगशाळेतील संशोधकांनी 14 दिवस कलिंगडाच्या अनेक जातींची चाचणी केलीये. ते 70-, 55- आणि 41-डिग्री फॅरेनहाइटवर कलिंगड साठवतात. त्यांना आढळलं की, ताज्या पिकलेल्या कलिंगडामध्ये 70-डिग्री फॅरेनहाइटवर ठेवलेल्या कलिंगडापेक्षा लक्षणीयरीत्या अधिक पोषक असतात.
कलिंगड कापल्यानंतर काही पोषक तत्वं निर्माण करत राहतात. ते थंड केल्याने ही संपूर्ण प्रक्रिया थांबते. शिवाय थंड तापमानात ते एका आठवड्यापेक्षा कमी वेळात कुजण्यास सुरवात करू शकतात.
निष्कर्षांमध्ये असं दिसून आलंय की, कलिंगड खोलीच्या तापमानावर साठवलं पाहिजे जेणेकरुन त्याचे फायदे मिळण्यास मदत होईल.
तज्ज्ञांच्या मते, कलिंगड रात्री कधीही खाऊ नये. याचं सेवन नेहमी दिवसा केलं पाहिजे. तसंच ते खाल्ल्यानंतर पाणी, दूध, लस्सी, कोल्ड्रिंक्स यासारख्या पदार्थांचं सेवन करू नये.