मुंबई : नवीन वर्ष सुरु होण्यासाठी काही तासांचा अवधी राहिला आहे. पण 2022 च्या आगमनापूर्वीच देशात कोरोनाच्या वाढत्या संख्येने चिंता वाढवली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, 24 तासांत कोरोनाच्या 13 हजार154 नवीन रुग्णांची नोंद झालीये. दरम्यान काही देशांमध्ये डेल्टापेक्षा ओमायक्रॉनचा प्रभाव जास्त असल्याचं दिसून आलं आहे.
आतापर्यंत भारतात कोरोनाची दुसरी लाट आल्याची नोंद आहे. मात्र बिहार आणि दिल्लीसह अनेक राज्यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाट आली असल्याचं म्हटलं आहे. भारतात, ओमायक्रॉन व्हेरिएंटची आतापर्यंत 900हून अधिक प्रकरणं नोंदवली गेली आहेत.
मुख्य म्हणजे 29 डिसेंबर रोजी कोरोनाच्या प्रकरणांमध्ये 44% ची वाढ झाली असल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान तज्ज्ञांच्या मताप्रमाणे , कोरोनाची ही झपाट्याने वाढणारी प्रकरणं ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे आहेत.
तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की, भारतात कोरोनाच्या वाढलेल्या प्रकरणांमुळे तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. दरम्यान या लाटेचा प्रभाव पहिल्या आणि दुसऱ्या लाटेइतका तीव्र नसू शकतो. तज्ज्ञांच्या मते, ही लाट फार कमी काळ टिकेल. मात्र 2022च्या सुरुवातीला कोरोनाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे म्हणडे रूग्णसंख्येत पीक येईल.
केंब्रिज विद्यापीठाच्या संशोधकांनी एक ट्रॅकर तयार केला आहे. या ट्रॅकरनुसार, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून नवीन संसर्गाची प्रकरणं वाढतील अशी शक्यता आहे.
IIT-कानपूरच्या एका अभ्यासात असं म्हटलं आहे की, भारतात या महामारीची तिसरी लाट 3 फेब्रुवारी 2022 पर्यंत पीकवर पोहोचू शकते. या अंदाजानुसार, प्रकरणांमध्ये वाढ 15 डिसेंबरपासून सुरू होणं अपेक्षित होतं.
नॅशनल कोविड-19 सुपरमॉडेल कमिटीने अंदाज वर्तवला आहे की, कोरोनाची तिसरी लाट पुढील वर्षाच्या सुरुवातीला पीकवर जाण्याची शक्यता आहे. दरम्यान समितीच्या सदस्यांनी सांगितलं की, ओमायक्रॉनने डेल्टाची जागा घेण्यास सुरुवात करताच, त्याची प्रकरणे दररोज वाढू लागतील.