मुंबई : देशातील कोरोनाच्या दुसरी लाट काही प्रमाणात ओसरताना दिसतेय. दरम्यान केरळ आणि महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे सरकारवरील ताण वाढताना दिसतोय. सध्या भारतात 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोरोना प्रतिबंधक लसी दिल्या जात आहेत. यामध्ये काही लसींचे दोन डोस दिले जातायत. यामध्ये कोव्हिशिल्ड लसीचे दोन दिले जात असून या लसीच्या दोन्ही डोसांमध्ये 84 दिवसांचं अंतर आहे.
यापूर्वी कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसांमधील अंतर कमी होतं. परंतु सरकारने त्यानंतर हे अंतर वाढवलं. दुसरीकडे, केंद्र सरकारने शुक्रवारी केरळ उच्च न्यायालयाला स्पष्टीकरणं दिलं की, कोविशील्ड लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये 84 दिवसांचे अंतर का ठेवलं गेलं आहे.
केंद्र सरकारने शुक्रवारी केरळ उच्च न्यायालयाला सांगितलं की, कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील 84 दिवसांचं अंतर कोरोनाविरुद्ध चांगलं संरक्षण देतं. किटेक्स गारमेंट्स लिमिटेडच्या रिटला उत्तर म्हणून केंद्र सरकारच्या वतीने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात हे नमूद करण्यात आलं आहे.
Kitex Garments ने 84 दिवसांची वाट न पाहता आपल्या कामगारांना कोविशील्डचा दुसरा डोस देण्यात यावा यासाठीची परवानगी मिळावी, अशी याचिका दाखल केली होती. केरळ उच्च न्यायालयाने मंगळवारी या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. मात्र केंद्राने कोविशिल्डच्या डोसमधील 84 दिवसांचे अंतर ‘जैसे थे’ ठेवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. यामुळे कोविशिल्डचा दुसरा डोस 84 दिवसांनीच घेता येणार आहे.
सध्या, कोविशिल्ड (Covishield), कोव्हॅक्सिन (Covaxin) आणि रशियन स्पुतनिक व्ही (Sputnik V) भारतात वापरल्या जात आहेत. आणखी काही लस चाचणीच्या वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. तिन्ही लसींच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये फरक आहे. कोविशिल्डच्या दोन डोसमध्ये सर्वात मोठे अंतर आहे. सध्या, कोविशील्डचे दोन डोस 84 दिवसांच्या अंतराने दिले जातात.