जखमेत घुसून मांस खाणारा बॅक्टेरीया; 48 तासांच्या आत रुग्णाचा मृत्यू! जगात वेगाने पसरतोय 'हा' आजार

STSS Dieses: हा एक जीवघेणा आजार असून वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.

Pravin Dabholkar | Updated: Jun 22, 2024, 03:58 PM IST
जखमेत घुसून मांस खाणारा बॅक्टेरीया; 48 तासांच्या आत रुग्णाचा मृत्यू! जगात वेगाने पसरतोय 'हा' आजार title=
STSS Dieses

STSS Dieses: पावसाळा म्हटलं की अनेक आजारांना आयतं निमंत्रण मिळतं. या काळात अनेकजण विविध आजारांना बळी पडतात. भारतातच नव्हे तर जगभरात अशी स्थिती आहे. कोविडच्या धक्क्यातून जग हळूहळू बाहेर पडतंय. अशावेळी जपानमध्ये एका नवीन प्राणघातक रोगाने दार ठोठावले होते. एसटीएसएस असे या आजाराचे नाव आहे. म्हणजेच स्ट्रेप्टो-कॉकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम. मांस खाणाऱ्या बॅक्टेरियामुळे हा आजार होत असल्याचे बोलले जात आहे. प्रत्यक्षात बा जीवाणू शरीराचे मांस खात नसून शरीरातील ऊतींचा नाश होतो. हे रुग्णासाठी अतिशय धोकादायक ठरते.यात दगावणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे.

एसटीएसएस आजार झालेल्या बहुतेक रुग्णांचा मृत्यू 48 तासांच्या आत होतो. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार जपानमध्ये 2024 मध्ये 1 हजार केसेस नोंदवल्या गेल्या आहेत. ही संख्या आणखी वाढण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. एसटीएसएस या रोगाचा मृत्यू दर 30 टक्के आहे. हा रोग स्ट्रेप्टो-कोकस या बॅक्टेरियामुळे होतो. एसटीएसएस या जीवाणूचे 2 प्रकार आहेत. ग्रुप-ए स्ट्रेप्टो-कोकस आणि ग्रुप-बी स्ट्रेप्टो-कोकस. यामधील ग्रुप-ए स्ट्रेप्टो-कोकस हा अधिक गंभीर जीवाणू मानला जातो.

एसटीएसएस जिवाणू संसर्गामुळे विषारी द्रव्ये शरीरात पसरतात. यामुळे उद्भवणाऱ्या लक्षणांना टॉक्सिक शॉक सिंड्रोम म्हणतात. हा एक जीवघेणा आजार असून वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो, असे डॉ कपिल सिंघल सांगतात. 

टॉक्सिक शॉक सिंड्रोमची कारणे कोणती?

हा एक जिवाणू संसर्ग आहे जो सामान्यतः स्टॅफिलोकोकस बॅक्टेरियामुळे होतो. कधीकधी हे स्ट्रेप्टोकोकस बॅक्टेरियामुळे देखील होते. हे जीवाणू विविध ठिकाणी तसेच काही वेळा आपल्या त्वचेवर असतात. प्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्यांना या विषाणूचा संसर्ग लगेच होऊ शकतो. त्यामुळे त्वचेवर पुरळ उठून जखमा होतात. 

एखाद्याला दुखापत झाली किंवा त्याची जखम उघडी राहिली असेल किंवा कोणीतरी शस्त्रक्रिया झाली असेल अशा लोकांनी काळजी घ्यायला हवी. यांच्या जखमेत जिवाणू संसर्ग वाढल्यास आणि वेळीच उपचार न केल्यास तिथे विषारी शॉक सिंड्रोम होऊ शकते. जर हा जीवाणू स्ट्रेप्टोकोकस असेल तर त्याला एसटीएसएस म्हणतात. अलीकडे जपानमध्ये याचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. मागील वर्षांच्या तुलनेत रुग्णसंख्येत जवळपास दुप्पट वाढ झाली आहे.

विषारी शॉक सिंड्रोमची लक्षणे काय आहेत?

सर्वात सामान्य लक्षण म्हणजे ताप.

- शरीराच्या कोणत्याही भागावर दुखापत झाली असेल, मुरुम फुटला असेल किंवा शस्त्रक्रिया झाली असेल तर तेथे खूप वेदना होतात.

- रक्तदाब कमी होण्यास सुरुवात होईल.

- यामुळे रुग्णाला बेशुद्ध आणि सुस्त वाटू लागते.

- मळमळ वाटेल.

- उलट्या होऊ शकतात.

एसटीएसएस जीवाणूचा संसर्ग झाल्यावर रुग्णाच्या शरीरात सर्वात आधी पायांना सूज दिसून येते. त्यानंतर काही तासांतच हा आजार संपूर्ण शरीरात पसरु लागतो. पुढे 48 तासांत रुग्णाचा मृत्यू होतो. जपानशिवाय युरोपातील 5 देशांमध्येही हा आजार पसरला आहे. यामध्ये ब्रिटन, फ्रान्स, आयर्लंड, नेदरलँड आणि स्वीडन या देशांचा समावेश आहे. 

प्रतिबंध आणि उपचार

टॉक्सिक शॉक सिंड्रोमवर वेळेवर उपचार न केल्यास ते प्राणघातक ठरू शकते. उपचारासाठी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधणे आवश्यक आहे. तुम्हाला तात्काळ अॅण्टीबायोटीक घ्यायला हवीत.  या आजारात अनेकदा रक्तदाब कमी होतो. त्यामुळे मल्टीऑर्गन फेल्युअरची भीती असते. अनेक अवयव एकाच वेळी काम करणे बंद करतात. त्यामुळे 48 तासांच्या आत व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी, रुग्णाला IV द्रवपदार्थ दिले जातात आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी, कधीकधी बीपी वाढवण्यासाठी औषधे देखील दिली जातात. यासोबतच अनेक चाचण्याही केल्या जातात. अशा रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार केले जातात. विषारी शॉक सिंड्रोमच्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. 

भारतात या सिंड्रोमच्या केसेस जास्त नाहीत. असे असले तरी आपण काळजी घ्यायला हवी. निष्काळजी राहून अजिबात चालणार नाही. 
हात धूत राहा. व्हायरल इन्फेक्शन असेल तर मास्क वापरा. जखम वाढत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.