जीममध्ये जाताना स्वत: बद्दलच्या 'या' 4 गोष्टींबाबत लाज वाटणं आत्ताच थांबवा

व्यायाम आणि जीमबाबत हे 4 समज -गैरसमज दूर ठेवाच!

Updated: Jun 3, 2022, 06:40 AM IST
जीममध्ये जाताना स्वत: बद्दलच्या 'या' 4 गोष्टींबाबत लाज वाटणं आत्ताच थांबवा title=

मुंबई : वजन वाढलंय म्हणून तुम्ही नवीन जीममध्ये जाणार आहात का? मात्र जीममध्ये जाण्यापूर्वी तुम्हालाही लाज किंवा संकोच वाचतोय का? जीममध्ये जर तुम्ही पहिल्यांदाच जाणार असाल तर कदाचित तुम्हाला संकोचल्यासारखे वाटू शकतं. अशा वातावरणामध्ये सुरुवातीला अवघड वाटणं स्वाभाविक आहे.

असं वाटत असल्यास लक्षात ठेवा जीममध्ये जाण्याचा तुमचं नेमकं ध्येय आणि उद्दिष्ट काय आहे. तसंच यासाठी व्यायाम आणि जीमबाबत हे 4 समज -गैरसमज दूर ठेवाच!

तुमचं स्वत:चं शरीर

जर जीममध्ये तुमचं वजन इतरांपेक्षा जास्त असेल आणि या गोष्टीची तुम्हाला लाज वाटत असेल तर हे थांबवा. कदाचित त्यांचं वजन काही महिने सतत केलेल्या व्यायामामुळे नियंत्रणात आलं असेल. त्यामुळे जीममधील फीट आणि बारीक लोकांकडे पाहून स्वत:बद्दल लाज वाटून घेण्यापेक्षा त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन व्यायाम करा.

नवीन मशिन वापरणं

जरी तुम्ही कधी जीममध्ये गेला नसाल तरी प्रत्येक मशिनबाबत योग्य ज्ञान करुन घेणं गरजेचं आहे. कारण जर तुम्ही तज्ज्ञांच्या मदतीशिवाय एखादं मशिन वापरले तर तुम्हाला दुखापत होण्याची शक्यता असते. जीममधील इतर व्यक्ती सर्व मशिनवर वर्कआऊट करु शकतात कारण त्यांना काही महिन्यांपासून व्यायाम करण्याचा सराव असतो. तुम्हाला देखील तसं केल्यास तुम्हालाही ते नक्कीच जमेल. त्यासाठी दोन आठवड्यांपासून तुम्ही ते शिकण्याचा जीममध्ये करीत असलेल्या प्रयत्न सोडून देऊ नका.

कपडे

जीममध्ये कोणतीही फॅशन परेड नसते. त्यामुळे जर तुमचे कपडे स्वच्छ आणि कन्फर्टेबल असतील तर तुम्हाला त्याबाबत संकोच वाटण्याचं कोणचंही कारण नाही. कारण ब्रॅन्डेड कपडे घालून तुमचं वजन कमी होणार नाही. त्यामुळे इतरांच्या कपड्यांशी आपल्या कपड्यांची तुलना करू नका. अशावेळी तुम्ही जे कपडे घातले आहेत त्यामध्ये मोकळेपणाने आणि आत्मविश्वासाने वावरा.

चांगलं दिसणं

काही महिला जीममध्ये मेक-अप करुन अथवा थोड्याफार अॅक्सेसरीज घालून येतात. पण यामुळे तुम्ही उदास होण्याचं कारण नाही. कारण तुम्ही जसा व्यायाम करु लागाल तसा तुमच्या चेहऱ्यावर देखील ग्लो येईल. त्यामुळे फक्त स्वत:च्या वर्कआऊटवर लक्ष द्या.