मुंबई : संशोधकांकडून वाइनप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रेड वाइनमध्ये अशा प्रकारचे घटक आढळून आले आहेत, ज्यामुळे निरुत्साहीपणा, उदासीनपणा, चिंता यांसारख्या समस्यांवर मदत मिळू शकते. झाडांपासून मिळणारा रेसवराट्रोल (Resveratrol) हा घटक शरीरातील तणावरोधी एंजाइम (सजीवांच्या शरीरात निर्माण होणारे द्रव्य) रोखून धरतो. त्यामुळे चिंता नियंत्रणात राहण्याची शक्यता असते.
अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ बफेलो येथे सहाय्यक प्राध्यापक असलेले यिंग जू यांच्या मते निरुत्साहीपणा, चिंता यांसारख्या समस्यांवर रेसवराट्रोल (Resveratrol) हे औषध म्हणून एक प्रभावी उपाय ठरु शकते.
'न्यूरोफार्माकोलॉजी' या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या निष्कर्षांवरून असे दिसून येते की, रेसवराट्रोल (Resveratrol) या घटकाचा न्यूरोलॉजिकल प्रक्रियांमध्ये कसा परिणाम होतो.
रेसवराट्रोल (Resveratrol) एक असा घटक आहे, ज्याचे स्वास्थ्यासाठी अनेक फायदे आहेत. द्राक्ष आणि बेरी या फळांच्या बिया आणि त्यांच्या सालीमध्ये रेसवराट्रोल (Resveratrol) हा घटक आढळतो.
संशोधकांनी रेसवराट्रोलमध्ये (Resveratrol) निरुत्साहीपणा रोखणारे घटक असल्याचं सांगितलं. मात्र, या घटकाचा फॉस्टोडिएस्टरेज-4सह (PDE4) काय संबंध आहे, याबाबत अद्याप शोध लावण्यात आलेला नाही. फॉस्टोडिएस्टरेज-4 (PDE4) हे एक शरीरातील असे एंजाइम आहे, जे तणाव हार्मोन कॉर्टिकोस्टेरोनद्वारे (corticosterona) प्रभावित होते.
कॉर्टिकोस्टेरोन हार्मोन (corticosterona) तणावाविरुद्ध शारीरिक क्रियांना नियंत्रित करण्याचं काम करते. अधिक ताण घेतल्याने मेंदूमध्ये या हार्मोनचे प्रमाण वाढते. त्यामुळे तणाव आणि अन्य मानसिक आजार वाढीस लागण्याची शक्यता असते.
संशोधकांच्या मते, रेड वाइनमध्ये असणाऱ्या रेसवराट्रोल (Resveratrol) या घटकामुळे चिंता, तणाव नियंत्रणात राहू शकतात.
मात्र मद्यपानामुळे नशेसहित इतर अनेक स्वास्थ्यासंबंधी धोका होण्याची शक्यता असल्याचंही सांगण्यात आलं आहे.