कुत्र्याने पोटावर उडी मारल्याने मालकाचा वाचवला जीव!

कुत्रा नेहमी मालकाच्या मदतीला धावून येतो असं म्हणतात. याचीच प्रचिती ब्रिटनमधील एका महिलेला आली आहे. या प्रकरणात महिलेच्या कुत्र्याने तिची मदतच नाही तर जीव वाचवण्याचंही मोठं काम केलं आहे. 

Updated: Sep 4, 2021, 02:44 PM IST
कुत्र्याने पोटावर उडी मारल्याने मालकाचा वाचवला जीव! title=

मुंबई : कुत्रा नेहमी मालकाच्या मदतीला धावून येतो असं म्हणतात. याचीच प्रचिती ब्रिटनमधील एका महिलेला आली आहे. या प्रकरणात महिलेच्या कुत्र्याने तिची मदतच नाही तर जीव वाचवण्याचंही मोठं काम केलं आहे. 

झालं असं की, ब्रिटनमध्ये राहणाऱ्या 41 वर्षांची टेस रॉबिनसन हिचं पोट वाढतं होतं. तिचं पोट इतकं वाढलं की ती चार महिन्यांची गरोदर असल्यासारखीच वाटत होती. तिचा पाळलेला कुत्रा लोला नेहमी तिच्या पोटाकडे पाहत राहायचा.

अचानक एका दिवशी तिच्या पोटात प्रचंड वेदना होऊ लागल्या. वेदना अधिक होत असल्याने ती आराम करण्यासाठी म्हणून झोपली होती. तेव्हा अचानक तिच्या कुत्र्याने तिच्या पोटावर उडी मारली. तेव्हा तिला पोटात गाठीसारखं काहीतरी जाणवलं.

या घटनेमुळे टेस खूप घाबरली होती. तिने लगेच डॉक्टरांकडे धाव घेतली. यानंतर डॉक्टरांनी तिच्या काही तपासण्या केल्या. तेव्हा तिच्या पोटात ट्युमर असल्याचं निदान झालं. पोटात ट्यूमर असल्याचं समजताच ती फार घाबरली. तिच्या पोटात 12 सेंटीमीटरचा ट्युमर होता. 

मुख्य म्हणजे हा ट्युमर साधा नव्हता तर कॅन्सरचा ट्युमर होता. जानेवारी 2021 मध्ये तिला ओव्हेरिअन कॅन्सर असल्याचं समजलं. लवकरच कॅन्सरचं निदान झाल्यामुळे योग्य वेळी उपचार करणं शक्य झालं. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. कॅन्सर ट्यूमरच्या रूपाने तिच्यावर मृत्यू ओढावणार होता. मात्र कुत्र्याने जणू तिचा जीव वाचवलाय.