मुंबई : ओमायक्रॉनच्या सर्व जगाची चिंता वाढवली आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या एंट्रीमुळे आता लस प्रभावी आहे का किंवा बूस्टर डोस घ्यावा का असे प्रश्न उपस्थित होऊ लागलेत. तर आता या वाढत्या धोक्यामुळे जर्मनीने चौथ्या कोविड बूस्टर डोसची घोषणा केली आहे.
तर दुसरीकडे ब्रिटन चौथ्या डोसचाही विचार करतंय. कारण याठिकाणी पुन्हा एकदा कोरोनाची प्रकरणं वाढू लागली आहेत. जर्मनीचे आरोग्य मंत्री कार्ल लॉटरबॅक यांनी बुधवारी सांगितलं की, कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनला सामोरे जाण्यासाठी लसीचा चौथा डोस आवश्यक असेल.
डेली मेलच्या माहितीनुसार, जर्मनीने ओमायक्रॉन व्हेरिएंटला लक्षात घेऊन तयार केलेली विशेष लस खरेदी करण्यासाठी लाखो नवीन डोसचे आदेश दिले आहेत.
आरोग्य मंत्री लॉटरबॅक म्हणाले की, मॉडर्नाची कोविड लस सध्या बूस्टर मोहिमांमध्ये वापरली जाते आणि जर्मनीने नवीन नोव्हाव्हॅक्स जॅबचे 4 दशलक्ष डोस आणि नवीन व्हॅलनेवा शॉटचे 1.1 कोटी डोस ऑर्डर केले आहेत, जे मार्केटिंग ऑथोरिटीच्या प्रतीक्षेत आहेत.
तज्ज्ञांच्या माहितीप्रमाणे, इस्रायल आणि जर्मनी या भागात रूग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी बूस्टर डोसची घोषणा केली होती.
DW.com च्या अहवालानुसार, जर्मनीच्या रॉबर्ट कोच इन्स्टिट्यूटच्या रोग नियंत्रण प्रमुखांच्या म्हणण्याप्रमाणे, जानेवारीच्या मध्यापर्यंत Omicron सर्वात प्रभावी प्रकार असेल. लोथर वेइलर यांनी चेतावणी दिली आहे की, येणारी ही संसर्गाची लाट जर्मनीमधील आरोग्य सेवेला वेठीस धरू शकते.