देशात मंकीपॉक्सचा धोका वाढला, 'या' राज्यात आढळला आणखी एक रुग्ण

कोरोनानंतर मंकीपॉक्सचा धोका, आणखी एक रुग्ण आढळला

Updated: Jul 18, 2022, 05:51 PM IST
देशात मंकीपॉक्सचा धोका वाढला, 'या' राज्यात आढळला आणखी एक रुग्ण title=

Monkeypox Virus : देशात मंकीपॉक्सचा धोका वाढत चालला आहे. मंकीपॉक्सच्या आणखी एका प्रकरणाची नोंद झाली आहे. केरळात मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण सापडला आहे. काही दिवसांपूर्वीच केरळमध्येच पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर आता मंकीपॉक्सची लागण झालेला दुसरा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी ही माहिती दिली आहे.

भारतात मंकीपॉक्सची फारशी प्रकरणं नोंदवली गेली नाहीत. पण जागतिक आरोग्य संघटनेने सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. जगातील 27 देशांमध्ये मंकीपॉक्सची सुमारे 800 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. 

केरळच्या रुग्णांची विदेशी कनेक्शन
केरळमध्ये आढळलेल्या दोन्ही प्रकरणांचं विदेशी कनेक्शन समोर आलं आहे. केरळमध्ये सापडलेला मंकिपॉक्सचा पहिला रुग्ण परदेशातून भारतात आला होता. भारतात आल्यानंतर त्याला खूप ताप आणि शरीरात तीव्र वेदना होत असल्याची तक्रार होती. दुसऱ्या प्रकरणातील व्यक्तीही दुबईहून भारतात परतली आहे. हा रुग्ण दोन महिन्यांपूर्वीच भारतात परतला होता, मात्र आता त्याच्यामध्ये मंकीपॉक्सची लक्षणे दिसू लागली आहेत.

मंकीपॉक्स आजाराला घाबरण्याची गरज नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. हा कोरोना व्हायरससारखा पसरत नाही, त्याची तीव्रताही कमी सांगितली जात आहे. या संदर्भात इंडिया मेडिकल टास्क फोर्सशी संबंधित केरळमधील वैद्यकीय तज्ज्ञ डॉ राजीव जयदेवन म्हणाले की, कोरोनाप्रमाणे मंकीपॉक्स हा वेगाने पसरणारा आजार नाही. यावर्षी अमेरिका आणि युरोपमध्ये सुमारे सहा हजार रुग्ण आढळले आहेत, परंतु यापैकी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. 

मंकीपॉक्स झालेल्या रुग्णामध्ये ताप, तीव्र डोकेदुखी, सूज, थकवा आणि शरीरावर बारीक फोड्या अशी लक्षणं जाणवतात.