लहान मुलांना Monkeypox चा किती धोका? यावर लस आहे का? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

तोच नव्यानं आणखी एक धोका संपूर्ण जगभर पसरताना दिसत आहे

Updated: Jul 26, 2022, 07:36 AM IST
लहान मुलांना Monkeypox चा किती धोका? यावर लस आहे का? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : कोरोनाच्या विळख्यातून संपूर्ण जग बाहेर पडत नाही, तोच नव्यानं आणखी एक धोका संपूर्ण जगभर पसरताना दिसत आहे. हा धोका आहे मंकीपॉक्सचा. भारतातही मंकीपॉक्सचे 4 रूग्ण आढळून आले आहेत. ज्यामुळं आता केंद्र आणि राज्य सरकार ही परिस्थिती पाहता अधिक सतर्क झाले आहेत. (monkeypox symptoms effect on children vaccine)

मंकीपॉक्सचा सर्वात पहिला रुग्ण 1958 मध्ये आफ्रिकेमध्ये आढळला होता. 1970 मध्ये या आजाराचा शिरकार माणसामध्ये झाला होता. मुळात इथे लक्ष देण्याजोगी बाब अशी, की मंकीपॉक्सचं नाव ऐकून त्याचा माकडांशी काही संबंध आहे, असा गैरसमज करुन घेऊ नका. कारण, प्राथमिक पातळीवर मंकीपॉक्स माकडामध्ये आढळला असला, तरीही मानवी शरीरातून दुसऱ्या मानवी शरीरात त्याचा संसर्ग वाढल्यास तिथं प्राण्याची भूमिका नगण्य होते. 

सध्याच्या घडीला हाती आलेल्या माहितीनुसार हा संसर्ग मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांनाच होऊ शकतो. लहान मुलं आणि गरोदर महिलांमध्ये या संसर्गाचा धोका तुलनेनं जास्त. 

5 वर्षांहून कमी वय असणाऱ्या मुलांना अधिक धोका 
अधिकृत चाचण्यांतून समोर आलेल्या माहितीनुसार पाच वर्षांहून कमी असणाऱ्या मुलांना या संसर्गाचा जास्त धोका आहे. याशिवाय 40 वर्षांहून कमी वय असणाऱ्या व्यक्ती, स्तनदा माता, गरोदर महिला यांच्यामध्येही मंकीपॉक्सचा धोका आहे. 

तज्ज्ञांच्या माहितीनुसार मंकीपॉक्स कोरोनाच्या तुलनेक काही अंशी अधिक धोकादायक आहे. पण जर स्मॉल पॉक्सची लस तुम्ही घेतली असेल, तर मात्र भीती वाटण्याची गरज नाही. 

मंकीपॉक्सची लस उपलब्ध आहे का? 
ज्याप्रमाणे कोरोनाच्या लसीसाठी सर्वांनाच प्रतीक्षा करावी लागलील होती, त्याचप्रमाणे मंकीपॉक्सच्या लसीसाठी प्रतीक्षा करण्याची गरज नाही. हा कोणताही नवा विषाणू नाही, त्यामुळं याची लाट येण्याची भीती आतापासूनच व्यक्त करण्याची गरज नसल्याचं तज्ज्ञांचं मत. 

ताप, जोकेदुखी, सांधेदुखी, सतत घाम येणं, हुडहुडी भरणं, घसा खवखवणं, त्वचेवर व्रण उमटणं ही मंकीपॉक्सची प्राथमिक लक्षणं आहेत. त्यामुळं भीतीपोटी अवाजवी चिंता न करता योग्य वेळी मंकीपॉक्सचा उपचार घेण्याचा सल्ला आरोग्य यंत्रणांकडून देण्यात येत आहे.