ब्रिटन : कोरोना धोका कमी होताना दिसत असतानाच एक नवीन समस्या पाय पसरतेय. भारतातंही आता मंकीपॉक्सचे रूग्ण सापडलेत. ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा मांकीपॉक्सच्या वाढत्या घटनांमध्ये, शास्त्रज्ञांना व्हायरसचं नवीन लक्षण सापडल्याची माहिती येत आहे. आकडेवारीनुसार, 28 जुलैपर्यंत ब्रिटनमध्ये 2,469 प्रकरणं समोर आली आहेत. आता मंकीपॉक्सने लोकांचा जीव घेण्यास सुरुवात केली आहे, ही चिंतेची बाब आहे.
एकीकडे मंकीपॉक्सची प्रकरणं वाढतायत तर ब्रिटीश मेडिकल जर्नलच्या एका नवीन अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, व्हायरसचा धोका असलेल्यांमध्ये सामान्य लक्षणं दिसत नाहीत. मंकीपॉक्सच्या रूग्णांमध्ये गुद्द्वार वेदना आणि प्रायव्हेट पार्टला सूज येणं अशी काही नवीन लक्षणे आढळून येत आहेत.
ही लक्षणे व्हायरसच्या पूर्वीच्या प्रादुर्भावामध्ये, प्रामुख्याने मध्य आणि पश्चिम आफ्रिकेमध्ये दिसली नाहीत. अभ्यासाच्या लेखकांनी सांगितलं की, नवीन निष्कर्षांनी व्हायरस-प्रभावित देशांतील पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवलेल्या समलिंगी, उभयलिंगी आणि इतर पुरुषांमध्ये मंकीपॉक्सचं कम्युनिटी ट्रांसमिशन होण्याची खातरजमा केली आहे.
मंकीपॉक्समुळे झालेल्या पहिल्या मृत्यूची नोंद दक्षिण अमेरिकेतही झाली आहे. शुक्रवारी आरोग्य मंत्रालयाने ब्राझीलच्या एका व्यक्तीचा संसर्गामुळे मृत्यू झाल्याची माहिती दिली. 41 वर्षीय व्यक्तीला गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यापाठोपाठ आता ब्रिटनमध्येही या व्हायरसचा दुसरा बळी गेला आहे.
ब्राझिलमध्ये मंकीपॉक्सचा एक बळी तर ब्रिटनमध्ये दोन बळी गेले आहेत. स्पेनच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार तिथे आतापर्यंत 4 हजारहून अधिक लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. यामध्ये 3500 पुरुषांचा समावेश आहे. तर महिलांची संख्या 64 आहे. युरोपीय संघात 5300 लोकांना मंकीपॉक्स होऊ नये म्हणून लस देण्यात आली आहे.