Health News : प्रौढांनो सतर्क व्हा! 'हा' संसर्ग तुम्हालाही होऊ शकतो, वाचा आरोग्याच्या दृष्टीनं मोठी बातमी

Health News : कोरोनाचं (Corona) संकट अद्यापही कमी झालेलं नसताना आणखी एका संकटानं राज्यात डोकं वर काढलं आहे. मुंबई (Mumbai) शहरावर हे सावट जास्त वेगानं फोफावताना दिसत आहे. 

Updated: Nov 21, 2022, 12:50 PM IST
Health News : प्रौढांनो सतर्क व्हा! 'हा' संसर्ग तुम्हालाही होऊ शकतो, वाचा आरोग्याच्या दृष्टीनं मोठी बातमी  title=
Measles Outbreak in Mumbai disease increased in adults too latest marathi news

Health News : कोरोनाचं (Corona) संकट अद्यापही कमी झालेलं नसताना आणखी एका संकटानं राज्यात डोकं वर काढलं आहे. मुंबई (Mumbai) शहरावर हे सावट जास्त वेगानं फोफावताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर पालिकेकडून नागरिकांना सतर्क राहत काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. इतकंच नव्हे, तर, ज्यांच्या घरात लहान मुलं आणि प्रौढ व्यक्ती आहेत त्यांनाही विशेष काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात येत आहे. 

गोवर झपाट्यानं पसरतोय 

मागील काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रणाणात गोवरचे (Measles) रुग्ण आढळले. हा प्रादुर्भाव वाऱ्याच्या वेगानं मुंबईतही (Measles in mumbai) पसला आणि आता प्रौढांनाही त्यामुळं धोका उदभवू लागला आहे. मुंबईच्या एम पूर्व प्रभागामध्ये 18 आणि 22 वर्षांच्या दोन व्यक्तींची नावं गोवरचे संशयित रुग्ण म्हणून नोंद करण्यात आलीय. 

शरीरावर पुरळ, ताप आल्यामुळे त्यांनी खासगी डॉक्टरांकडे उपचार घेतला. त्यावेळी तपासात दोघांनाही गोवरची लक्षणं आढळून आल्याने महापालिकेकडे याची नोंद करण्यात आली. आता या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. पण, मुलांसोबत आता प्रौढांनाही गोवरची लागण होत असल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 

काय आहेत गोवरची लक्षणं? (Symptoms of Measles )

प्राथमिक स्तरावर हाती असणाऱ्या माहितीनुसार गोवर हा एक विषाणूजन्य आजार आहे. जो लसीकरणामुळं बरा होतो. वयवर्षे 5 आणि त्याहून कमी वयाच्या मुलांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव दिसून येतो. 
- ताप येणे (Fever)
- खोकला येणे 
- डोळ्यांची जळजळ 
- वाहणारं नाक
- सुरुवातीला चेहऱ्यावर आणि नंतर संपूर्ण शरीरावर लाल- सपाट पुरळं

अधिक वाचा : राज्यातील गोवर रुग्णांबाबत धक्कादायक माहिती समोर; आतापर्यंत 9 संशयितांचा मृत्यू

काहीजणांमध्ये गोवरमुळं अतिसार, कानाचा संसर्ग, न्यूमोमिया, अंधत्व किंवा मेंदूचा संसर्ग अशी लक्षणंही दिसून येतात. या विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव सध्या देशातील विविध राज्यांमध्येसुद्धा पाहायला मिळत आहे. त्यामुळं काळजी घेत, वरीलपैकी कोणतीही लक्षणं दिसल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्य़ात येत आहे.