World Mosquito Day : जाणून घ्या डासांच्या प्रजाती आणि त्यामुळे पसरणारे गंभीर आजार

आज 20 ऑगस्ट म्हणजे जागतिक डास दिन. 

Updated: Aug 20, 2021, 07:26 AM IST
World Mosquito Day : जाणून घ्या डासांच्या प्रजाती आणि त्यामुळे पसरणारे गंभीर आजार title=

मुंबई : आज 20 ऑगस्ट म्हणजे जागतिक डास दिन. आजच्या दिवशी 20 ऑगस्ट 1897 रोजी डॉ. रोनाल्ड रॉस यांनी कलकत्तामध्ये हिवतापाचे जंतू हे डासांच्या पोटात आढळून आल्याचा शोध लावला. हा शोध आपल्याच देशात लावल्याने या दिवसाला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं. त्यामुळे हा दिवस जागतिक मच्छर दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. तो साजरा करताना दरवर्षी एक संकल्पना ठरवली जाते या वर्षीची संकल्पना आहे हिवतापाचे उच्चाटन करूया.

जगामध्ये डासांच्या जवळजवळ 3500 प्रजाती आहेत. या प्रजाती साधारणत: ॲनाफिलिस, क्युलेक्स, एडीस आणि मंसोनिया चार जमातींमध्ये विभागलेले आहेत. या चार जमाती वेगवेगळ्या आजारांचा प्रसार करतात. ॲनाफिलिस डासापासून हिवतापाचा प्रसार होतो, कुलेक्स डासा पासून हत्तीरोग आणि जपानी मेंदुज्वर या आजाराचा प्रसार होतो. तर एडीस डासापासून झिका, डेंग्यू चिकनगुनिया या आजारांचा प्रसार होतो आणि मंसोनिया डासापासून हत्तीरोग होतो. 

हिवतापाचे प्रसार करणारे डास

हिवताप हा एक थंडी वाजून येणारा ताप असून या आजाराचे सर्वाधिक प्रमाण हे आफ्रिकेमध्ये आणि त्यानंतर आशिया खंडामध्ये दिसून येते या आजाराचा प्रसार करणाऱ्या डासाचे नाव आहे ॲनाफिलिस. महाराष्ट्रामध्ये ॲनाफिलीस या डासाच्या तीन प्रजाती पासून हिवताप होत असतो त्या आहेत ॲनाफिलिस क्युलिसीफिसेस, ॲनाफिलिस स्टिफेंसी, ॲनाफिलिस फ्लुवातलीस.

हे डास साचलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये अंडी घालतात. या डासाच्या पंखावर पांढरे ठिपके असतात आणि हा डास भिंतीशी 45 अंशाचा कोन करून बसतो. हे डास रात्री अथवा पहाटे चावत असतात. एकदा चावल्यानंतर हा डास तीन दिवस पूर्णपणे भिंतींवर विश्रांती घेत असतो त्यामुळे या डासाच्या प्रतिबंधासाठी घरोघरी नियमित फवारणी केली जाते.

डेंगी, चिकनगुनिया व झिका आजार

हे आजार हा एडीस डासाच्या प्रजाती पासून होतो. महाराष्ट्रामध्ये या प्रजातीच्या तीन प्रजाती या आजारांचा प्रसार करतात. एडीस इजीप्ती, एडीस अल्बोपिक्टस व एडीस विटाटस यांच्यामार्फत या आजारांचा प्रसार होत असतो. या डासांच्या अंगावर आणि पायावर पांढरे पट्टे दिसून येतात तसंच रंगाने काळपट असतात. हे डास दिवसा चावतात आणि वारंवार चावतात. त्यामुळे घरातील सर्व लोक बाधित करण्याची शक्यता असते. 

हे डास विश्रांतीसाठी लोबकळणारे वस्तू, पडदे, वायर यावर तसेच अंधाऱ्या आणि थंड जागी राहतात. त्यामुळे या आजारांमध्ये प्रामुख्याने हे डास मारण्यासाठी धूर फवारणी केली जाते. हा डास साचलेल्या व साठवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये अंडी घालतो. हा डास फुटकी टायर्स डबे बाटल्या इत्यादी घराच्या आजूबाजूला जे निरुपयोगी साहित्य असते त्यामध्ये पावसाचे पाणी साचून तयार झालेल्या ठिकाणी अंडी घालत असतो. 

हत्तीरोग

हत्तीरोग हा विकसनशील देशांना अत्यंत भेडसावणारा असा हा आजार आहे. खरतर या आजाराची गणना ही NTD (Neglected Tropical Disease) मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. खऱ्या अर्थाने हा दुर्लक्षित परंतु सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आजार आहे. या आजाराचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पायाला येणारी सूज ही एकदा सुरु झाली थोड्याफार पद्धतीने नियंत्रित करता येते. परंतु एकदा हा आजार झाला तर तो मात्र शेवटपर्यंत बरा होत नाही. 

हत्ती रोगाचा प्रसार हा कूलेक्स डासांच्या प्रजाती पासून होतो. हत्तीरोग हा कूलेक्स क्विंकीफिसीयाटुस या प्रजातीपासून होतो. या डासांचं प्रजनन हे घाणेरड्या तसंच प्रदूषित पाण्यामध्ये होतं. गटारं, नाले, सेप्टिक टॅंकमध्ये अंडी घालत असतो. या आजारात गटारी वाहती करणं सेप्टिक टॅंकला जाळ्या बसवणं, वेंट पाईपला जाळी बसवणं इत्यादी उपाय योजना केल्या जातात. या डासाची चावण्याची सवय ही संध्याकाळच्या वेळेला तिन्ही सांजेच्या वेळेला असते. 

जपानी मेंदुज्वर

हा आजार कूलेक्स विष्णूई या प्रजातीच्या डासांपासून होत असतो. हा डास प्रमुख्याने जिथे भात शेती किंवा पान वनस्पती आहेत अशा ठिकाणी प्रजनन करतो. या आजाराचे वैशिष्ट्य म्हणजे माणसाला या आजाराची लागण ही अपघाताने होते परंतु या आजाराची तीव्रता लहान मुलांच्या मध्ये जास्त आहे. हे डास विश्रांतीसाठी घराच्या बाहेरच्या बाजूला झाडाझुडपामध्ये विश्रांती घेतात त्यामुळे या आजारांमध्ये आपण घरामध्ये तसंच घराबाहेर धूर फवारणी करत असतो.