ब्रिटन : भारतात कोरोना व्हायरसचं संकट अजून निवळलेलं नाही. अशातच आता अजून एका आजाराने डोकं वर काढलं आहे. Lassa Fever किंवा Lassa Virus असं म्हटलं जातंय. या आजाराने ब्रिटनमध्ये थैमान घातलं असून एका व्यक्ती मृत्यूही झाला आहे.
तीन संक्रमितांपैकी एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, लासा फिवरचा मृत्यूदर अजून 1 टक्का आहे. मात्र कोरोनाच्या महामारी दरम्यान हा फिवर एक चिंतेचा विषय ठरू शकतो. खासकरून गर्भवती महिलांसाठी हा फिवर धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.
ब्रिटनच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे, लासा फिवरची 3 प्रकरणं समोर आली आहेत. यामध्ये 11 फेब्रुवारी रोजी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मुख्य म्हणजे या तापाची लागण झालेले सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत.
तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, लासा फिवर हा संक्रमित उंदराच्या विष्ठा आणि लघवीद्वारे पसरतो. जर एखादी व्यक्ती उंदराच्या मलमूत्राच्या संपर्कात आली तर त्याला लासाची लागण होऊ शकते. यानंतर, संक्रमित व्यक्तीकडून इतर लोकांपर्यंतही संक्रमण पोहोचू शकतं.
या फिवरची लक्षणं 1 ते 3 आठवड्यांनंतर विकसित होईपर्यंत लासा व्हायरस एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरत नाही. लासा फिवरच्या लक्षणांमध्ये थकवा, डोकेदुखी, अशक्तपणा, ताप श्वास घेण्यास त्रास होणं, चेहरा लाल होणं, रक्तस्त्राव, छातीत दुखणं, ओटीपोटात धक्का किंवा उलट्या जाणवू शकतात.